जयसिंगपूर येथील उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे ५ कोटींची खंडणी मागणार्‍याला अटक

उद्योजक संजय घोडावत

कोल्हापूर – जयसिंगपूर येथील घोडावत उद्योग समूहाचे उद्योजक संजय घोडावत आणि त्यांचे बेळगावमधील भागीदार निलेश बागी यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागणारा रमेशकुमार ठक्कर याला हातकणंगले पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या प्रकरणी संजय घोडावत यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ठक्कर याचा साथीदार व्ही.पी. सिंह पळून गेला आहे.

संशयित ठक्कर याने १३ ते १८ जून या कालावधीत ‘व्हॉटस्ॲप कॉलिंग’, लघुसंदेश, तसेच विविध भ्रमणभाष क्रमांकावरून संजय घोडावत यांच्याशी संपर्क साधला. ‘मूल्यवर्धित कर चुकवून तुम्ही कर्नाटक सरकारची फसवणूक केली आहे. माझ्याकडे या संदर्भातील पुरावे आहेत. तुम्ही जर ५ कोटी रुपये दिले नाहीत, तर ते पुरावे कर्नाटक सरकारला देईन’, अशी धमकी ठक्कर याने घोडावत यांना दिली. या माहितीच्या साहाय्याने  हातकणंगले पोलिसांनी मुंबईत सापळा रचला. खंडणीतील पैशांची काही रक्कम घेऊन ठक्कर यांना मुंबईतील एका उपाहारगृहात बोलावले होते. ती रक्कम पोलिसांनी एका व्यक्तीकडून पाठवली. पैसे कह्यात घेत असतांनाच पोलिसांनी रमेशकुमार ठक्कर याला अटक केली.