‘सेंट्रल व्हिस्टा’संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळली !

केवळ याच प्रकल्पाला विरोध का? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

‘सेंट्रल व्हिस्टा’(देहलीमध्ये बांधण्यात येणारे नवीन संसद भवन)

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने मे मासामध्ये ‘सेंट्रल व्हिस्टा’(देहलीमध्ये बांधण्यात येणारे नवीन संसद भवन) संदर्भात दिलेल्या निर्णयावर करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ‘कोरोनाच्या कालावधीमध्ये सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम थांबवण्यात यावे’, अशी मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. ‘सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम कोरोना नियमांचे पालन करून केले जात आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले आहे. ‘याच प्रकारच्या अन्य प्रकल्पांचे काम चालू असतांना तुम्ही कोरोना कालावधीमध्ये केवळ सेंट्रल व्हिस्टाचेच बांधकाम कोरोनाचे कारण देत थांबवण्याची मागणी का केली आहे ?’ असा प्रश्‍नही न्यायालयाने उपस्थित केला. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली होती.

सर्वोच्च न्यायालयाने पुढे विचारले की, तुम्ही ही याचिका करतांना काही संशोधन केले आहे का ? असेल, तर त्याचा याचिकेमध्ये समावेश आहे का ? तुम्ही सध्या किती प्रकल्पांवर काम चालू आहे, याचा अभ्यास केला आहे का ? एकाच प्रकल्पाविरोधात अर्ज का करण्यात आला आहे ? असे प्रश्‍न उपस्थित केले.