संभाजीनगर येथे मोठ्या बहिणीची छेड काढणार्‍या टवाळखोराला धाकट्या बहिणीने दिला चोप !

महिलांनो, अशा प्रकारे टवाळखोरांना धडा शिकवून सुरक्षित रहा !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – शहरातील सूतगिरणी चौकाच्या परिसरात २ टवाळखोरांनी एका तरुणीची छेड काढल्यानंतर धाकट्या बहिणीने एका टवाळखोराला चोप देण्याची घटना २५ जून या दिवशी येथे घडली.

१. ही तरुणी रस्त्यावरून जातांना टवाळखोरांनी बरेच अंतर तिचा पाठलाग केला. नंतर तिला रोखून तिची छेड काढली.

२. त्याविषयी ती त्यांना खडसावत असतांनाच ते टवाळखोर तिची आणखी छेड काढू लागले. ही माहिती मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीला दूरभाषवरून दिली.

३. थोड्या वेळाने धाकटी बहीण घटनास्थळी येऊन दोघांपैकी एका टवाळखोराला पकडून चोप दिला. २५ वर्षे वयाच्या या तरुणीने अनुमाने १५ मिनिटे छेड काढणार्‍याला चांगलाच धडा शिकवला.

४. काही वेळापूर्वी भररस्त्यावर छेड काढणारा दोन्ही बहिणींच्या हातपाया पडून आणि गयावया करत क्षमा मागत होता. कशीबशी स्वतःची सुटका करून तो पळाला.

५. धाकट्या बहिणीचा रुद्रावतार पाहून दुसर्‍या टवाळखोराने दुचाकी तेथेच सोडून पोबारा केला. हा प्रकार पहाण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यातील महिलांनी त्या दोन्ही बहिणींच्या धाडसाचे कौतुक केले.

६. अडीच वर्षांपूर्वी धाकट्या बहिणीने तिच्या मैत्रिणीची एका ‘मॉल’मध्ये छेड काढणार्‍याला भरस्त्यात मारले होते. ‘ज्यांना ज्या भाषेत समजते त्याच भाषेत समजून सांगावे लागते’, असे त्या तरुणीने सांगितले.