पुणे महापालिकेची २ कोटी रुपयांची बँक हमी जप्त करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे, २६ जून – उरळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो येथील कचरा डेपोविषयी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने पुणे महापालिकेने दिलेली २ कोटी रुपयांची बँक हमी जप्त करावी आणि या रकमेचा वापर पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुणे महापालिका आणि महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायूमर्ती कुमार गोयल, न्यायिक सदस्य न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल, न्यायमूर्ती एम्. सत्यनारायण, न्यायमूर्ती बिजेश सेठी आणि तज्ञ सदस्य डॉ. नागिन नंदा यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली. त्या वेळी हा आदेश देण्यात आला. या प्रकरणी भगवान भाडाळे, विजय भाडाळे आणि ग्रामपंचायत उरुळी देवाची यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. आताच्या कचरा डेपोत २०० मेट्रिक टन कचरा प्रकिया प्रकल्प चालू करण्याच्या हालचाली चालू असल्याचे याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या लक्षात आणून दिल्यावर त्यावर नवीन कचरा प्रक्रिया चालू करणार नाही, असे निवेदन पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिले आहे.

या संदर्भात याचिकाकर्ते भगवान भाडाळे म्हणाले, ‘‘उरळी देवाची फुरसुंगी येथील लोकांसाठी हा मोठा विजय आहे. अनेक वर्षांपासूनच्या आमच्या मागणीला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मान्यता दिली आहे. आता लोकांच्या समस्या दूर होतील. या भागातील हवा आणि वातावरण चांगले होईल. पालिका या आदेशाची कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे.’’