अतिरिक्त शुल्क आकारणार्‍या शाळांवर फौजदारी कारवाई करा ! – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

बच्चू कडू

नागपूर – ‘गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त गोष्टींसाठीचे पालकांकडून शुल्क वसूल करणार्‍या शाळांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई करावी’, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे दिले. नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारींची नोंद घेत कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांची १९ जून या दिवशी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

मुळात शाळा बंद असतांना शुल्क आकारणेच अनधिकृत आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनीही ‘नैसर्गिक आपत्तीच्या काळात शाळांनी अतिरिक्त शिक्षण शुल्क आकारू नये’, असे निर्देश दिले आहेत; परंतु नागपूर विभागातील काही शाळा याकडे दुर्लक्ष करून शिक्षण शुल्क वसूल करत आहेत. ‘राज्य शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम २०११ ची संपूर्ण राज्यात कठोर कार्यवाही करावी. प्रत्येक नियमाचे शाळांनी पालन करावे. कुठेही अतिरिक्त शुल्क आकारल्याचे आढळता कामा नये. पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आवश्यक पडताळणी आणि कारवाई वेळीच करावी’, असे निर्देश कडू यांनी दिले.