पोलिसांनाही धक्काबुक्की
कुडाळ – शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त १९ जूनला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी पेट्रोलपंपावर ‘अल्प दरात पेट्रोल विक्री’ उपक्रम राबवला. या वेळी ‘येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल विक्री करण्यापूर्वी प्रशासनाची कोणतीही अनुमती शिवसेनेने घेतली नाही’, असे कारण सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मोठा विरोध केला. या वेळी प्रकरण हातघाईवर आल्याने वातावरण चांगलेच तापले. या वेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांना आमदार नाईक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘१०० रुपयांत २ लिटर पेट्रोल मिळेल’, अशी घोषणा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली होती. यासाठी त्यांनी कुडाळ शहरातील भाजपचे खासदार नारायण राणे यांचा पेट्रोलपंप असलेले ठिकाण निवडले होत. याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यावर ‘आम्ही विधायक काम करत असतांना भाजप रडीचा डाव खेळत आहे’, असा आरोप शिवसैनिकांनी केला. या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील तणावाच्या वातावरणामुळे प्रकरण हातघाईवर येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करत पेट्रोल विक्री रोखली आणि ‘पर्यायी पेट्रोलपंपाची निवड करा’, अशी सूचना आमदार नाईक यांना केली. या संतप्त वातावरणात पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली.
भाजपकडून पोलिसांचे अभिनंदन
हे प्रकरण घडल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई यांनी पोलिसांना धक्काबुक्की करणारे आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना रोखणारे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे अभिनंदन केले.
शिवसैनिकांवर गुन्हा नोंद करण्याची भाजपची मागणी
शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळ येथे झालेला प्रकार आमदार वैभव नाईक यांना भूषणावह नाही. पोलिसांना धक्काबुक्की करण्यासह चुकीच्या पद्धतीने गर्दी जमवणार्या आमदार नाईक यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करावा अन्यथा भाजप गप्प बसणार नाही, अशी चेतावणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळमध्ये घडलेला प्रसंग दुर्दैवी ! – माजी आमदार परशुराम उपरकर
कणकवली – कुडाळ येथील घटनेवर प्रतिक्रिया देतांना मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, ‘‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली, ती शिवसेना लोकोपयोगी कामे करते. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आजपर्यंत लोकोपयोगी कामे होत आली; मात्र बाहेरून आलेल्या उपर्यांना शिवसेनेच्या वर्धापनदिनाची व्याख्या समजली नाही. शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळ येथे घडलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे. आमदार वैभव नाईक यांनी अशाप्रकारे दुसर्याच्या पेट्रोलपंपावर अल्प दरात पेट्रोल देऊन ‘राडा’ करण्यापेक्षा स्वत:च्या पेट्रोलपंपावरून पेट्रोल द्यायला हवे होते.’’