हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शक उद्गार !

‘साधना न करता हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) येईल’, असे समजू नका !

पराक्रमी असणार्‍या पांडवांनाही कौरवांविरुद्धच्या युद्धात श्रीकृष्णाचे साहाय्य घ्यावे लागले, तर श्रीकृष्ण आणि साधना यांविना ‘आम्ही हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करू’, असे म्हणणे किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येईल.

‘साधनेचे बळ आणि समर्थ रामदासस्वामींचे मार्गदर्शन असल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक क्रांतीविरांमध्ये प्रखर राष्ट्राभिमान असूनही साधनेचे बळ नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी न होता त्यांना नाहक प्राण गमवावे लागले होते. राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांनी ‘दासबोध’ ग्रंथात लिहिले आहे,

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥

– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

अर्थ : चळवळ करणे आपल्या हातात आहे; परंतु कार्याचे योग्य नियोजन व्हावे आणि कार्य यशस्वी व्हावे, यांसाठी भगवंताचे अधिष्ठान अन् साधनेची आवश्यकता आहे.

दुष्टांकडून भक्तांचा छळ झाला, तरच ईश्वर अवतार घेतो; म्हणून आपण साधना करून ईश्वराचे भक्त झालो, तरच आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्वराचे पाठबळ मिळणार आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले


हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना आवश्यक !

‘नामजपाने दैवी शक्तींचे साहाय्य लाभते. अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; पण त्याचसमवेत तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामजपामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे. नामजपाने प्रत्येक कर्म अकर्म होते, म्हणजे त्या कर्माचे पाप-पुण्य लागत नाही. यावरून ‘हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेचे कार्य करतांना नामजप करणे किती आवश्यक आहे’, हे लक्षात येईल.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले