प्रेमळ, समंजस आणि सर्वांशी जवळीक असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी पुणे येथील कु. शर्वणी मिलिंद चव्हाण (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. शर्वणी मिलिंद चव्हाण एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. शर्वणी मिलिंद चव्हाण हिचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

(‘वर्ष २०१५ मध्ये कु. शर्वणी चव्हाण हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)

कु. शर्वणी चव्हाण हिला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. प्रेमभाव

सौ. मंजिरी चव्हाण

‘कु. शर्वणीमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. मी अनेक वेळा सेवेसाठी बाहेर गेल्यावर ती घरी कान्हाला (कु. पार्थला, शर्वणीचा लहान भाऊ) सांभाळणे आणि खाऊ घालणे या कृती प्रेमाने करत असे. तिला सर्व नातेवाईक, साधक, तिच्या शाळेतील मैत्रिणी यांच्याविषयी प्रेम आणि आपुलकी वाटते. तिच्याशी कुणी अयोग्य वर्तन केले, तरी ती मनात अढी न ठेवता त्या व्यक्तीशी प्रेमाने बोलते. ती सर्वांनाच साहाय्य करण्याचा प्रयत्न करते.

२. समंजसपणा

कु. शर्वणी ७ वर्षांची असतांना तिच्या लहान भावाला आजारी असल्याने पुण्याला रुग्णालयात भरती केले होते. मी आणि तिचे बाबा त्याच्या समवेत होतो. त्या वेळी ती आजी समवेत घरी राहिली. तसेच शाळेच्या स्नेहसंमेलनात सहभागी झाली. त्या वेळी ती पुष्कळ स्थिर राहिली. तसेच ‘आमची विचारपूस करणे आणि स्वतःच्या वैयक्तिक कृती करणे’, असे सर्व तिने समंजसपणे केले.

३. सर्वांशी जवळीक असणे

एकदा मी तिला शाळेत सोडायला गेले होते. तेव्हा तिच्या मैत्रिणींच्या समवेत अन्य वर्गांतील लहान-मोठ्या मुलीही तिच्याभोवती गोळा झाल्या होत्या. तेव्हा ‘तिची सर्वांशीच पुष्कळ जवळीक आहे’, असे मला जाणवले. ती शाळेतील सर्व नियमांचे पालन करते. त्यामुळे शाळेतील शिक्षकही तिचे पुष्कळ कौतुक करतात.

४. मितभाषी असून नम्र असणे

ती मितभाषी असून नेहमी अनावश्यक बोलणे टाळते. ती सर्वांशी नम्रतेने आणि प्रेमाने बोलते.

५. प्रांजळपणा

तिला तिची चूक सांगितली की, ती मनाची अयोग्य विचारप्रक्रिया प्रांजळपणे सांगते. चूक लक्षात आल्यावर ती लगेच क्षमायाचना करते आणि प्रायश्‍चित्त घेते.

६. परिस्थिती स्वीकारणे

तिला लहान असल्यापासून सेवा करायला पुष्कळ आवडते; पण गुरुपौर्णिमा आणि सभा अशा कार्यक्रमाच्या वेळी आम्ही दोघे दायित्व घेऊन सेवा करायचो. त्यामुळे परिस्थिती स्वीकारून ती संपूर्ण वेळ कान्हाला सांभाळत असे.

७. आजारपणात काळजी घेणे

मी आजारी असतांना ती घरातील सर्व सेवा स्वतःहून करते. त्या वेळी अधूनमधून माझी विचारपूस करून मला काही ‘हवे नको’, तेही पहाते.

८. शिकण्याची आवड

ती मला घरातील सेवांमध्ये साहाय्य करते. ‘ती १० ते १२ दिवसांत कूकर लावणे, ठराविक भाजी आणि पोळ्या करणे’, असा स्वयंपाक करायला शिकली.

९. तिला शंख शिंपले आणि वेगवेगळे दगड गोळा करायला आवडतात. ते सर्व ती अगदी व्यवस्थित जपून ठेवते. त्यापैकी एका दगडावर ॐ उमटला आहे.

१०. सात्त्विक गोष्टींची आवड असणे

तिला नेहमी सात्त्विक वस्तू आणि पोशाख आवडतात. तिने कधीच जीन्ससारखे कपडे घातले नाहीत. ती शाळेत किंवा नातेवाइकांकडे जातांनाही सात्त्विक पोशाख, कुंकू लावणे आणि बांगड्या घालणे या कृती आवडीने करते.

११. धर्माभिमान असणे

देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी तिच्या मनात पुष्कळ आदर आहे. कुठेही देवतेचे किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असेल, तर ती तो कागद सांभाळून ठेवते. सात्त्विक उत्पादनाच्या खोक्यावर असलेले सर्व लोगो व्यवस्थित कापून ती अग्नी विसर्जन करते. कधीही कचर्‍यात जाऊ देत नाही.

१२. सद्गुरु आणि संत यांच्याप्रती भाव

अ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याविषयी तिच्या मनात पुष्कळ भाव आहे. ती त्यांनी सांगितलेली सर्व सूत्रे कृतीत आणण्याचा प्रयत्न करते.

आ. एक दिवस सकाळपासूनच शर्वणीने सात्त्विक कपडे (परकर पोलके) घातले होते. त्याच दिवशी एका संतांचा सत्संग मिळाला. संतांविषयी तिच्या मनात पुष्कळ भाव आहे. ‘सत्संगात तिने घातलेल्या कपड्यांमध्येही चैतन्य आहे’, असा भाव असल्याने सत्संगाला २ मास होऊनही तिच्या कपड्यांना गुलाबाचा सुगंध येत होता.

१३. कु. शर्वणीमध्ये असलेले स्वभावदोष

भित्रेपणा, प्रतिमा जपणे आणि आळस

केवळ श्रीगुरुकृपेने या दैवी बाळाच्या समवेत रहाण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.

कु. शर्वणीमध्ये असलेले गुण माझ्यामध्ये येण्यासाठी माझ्याकडून तळमळीने प्रयत्न होऊ दे, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी आर्त प्रार्थना !’

– सौ. मंजिरी चव्हाण (आई), पुणे (४.६.२०२१)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.