पर्यावरणाच्या प्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम आणि उपाययोजना !

देवाने दिलेला निसर्गाचा आनंद आपण घेत आहोत; पण तो पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. त्या दृष्टीने जागरूकता येऊन कृती व्हावी, हा या लेखामागील उद्देश आहे.

१. असा झाला पर्यावरणाच्या प्रदूषणाला प्रारंभ !

पूर्वीच्या काळी पर्यावरण शुद्ध होते. भरपूर झाडे होती. लोकसंख्या अल्प होती, प्रवासासाठी गाड्या, रेल्वे किंवा विमाने नव्हती. घरे सेंद्रिय वस्तू म्हणजे माती, दगड यांपासून बनवली जात असत. जसजसा माणसांचा बाह्य विकास होत गेला, तसतशी झाडे कापून मोठमोठ्या इमारती या रासायनिक वस्तू जसे काँक्रीटपासून बांधल्या गेल्या. पेट्रोल आणि डिझेल वापरणारी वाहने आली, कारखाने आले, प्लास्टिक उत्पादन चालू झाले. यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण झाले.

डॉ. (सौ.) लिंदा बोरकर

२. पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे निसर्गाची हानी होणार असणे

सध्या वेगवेगळ्या देशांना एकत्र येऊन पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी योजनात्मक परिषदांचे आयोजन करावे लागत आहे; पण पर्यावरणाचे प्रदूषण चालूच आहे. त्यामुळे येणार्‍या काळात निसर्गाची हानी होऊन त्याचा कोप झाल्यास सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतील !

३. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानीकारक

आपले पूर्वज प्रतिदिन केळीच्या पानावर जेवत. नंतर स्टीलची ताटे आली. आता काचेच्या ताटांचा वापर केला जातो. घरात काही कार्यक्रम असल्यास किंवा सार्वजनिक कार्यक्रम स्थळी नाश्ता किंवा जेवण असल्यास प्लास्टिक, स्टायरोफोम यांपासून बनवलेली ताटे किंवा पेले वापरले जातात. ते पर्यावरणासाठी हानीकारक असतात. टाकून दिल्यावर त्या वस्तूंचे विघटन होत नाही.

४. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने होणारे दुष्परिणाम !

पूर्वी कोणत्याही खरेदीला जातांना कपड्याची पिशवी नेली जात असे. हळूहळू दुकानदार पातळ प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकाला देऊ लागले. इथूनच स्वतः पिशव्या नेण्याची लोकांची सवय मोडली. पिशव्या बनवणार्‍या कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली. प्लास्टिक हे पर्यावरणात वर्षानुवर्षे विघटन न होता तसेच रहाते.

४ अ. गुरांच्या पोटात प्लास्टिक जाणे : समाजातील लोक प्लास्टिकच्या पिशव्या वापरून कुठेही टाकून देतात. बरेचदा गुरे चारा न खाता या प्लास्टिक पिशव्याच खातात. यामुळे त्यांच्या पोटात प्लास्टिक जाऊन त्यांना आजार होतात. त्याचा परिणाम दुधावर होतो. दुधातून वासरांना, तसेच दूध सेवन करणार्‍यांवरही विपरित परिणाम होऊ शकतो.

४ आ. प्लास्टिकच्या भांड्यांत अन्न ठेवल्याने कर्करोगाची शक्यता असणे : प्लास्टिकच्या पिशव्या भाजीपाल्यासाठी वापरल्या जातात. काही उपाहारगृहांमध्ये गरम जेवणही पिशव्यांमध्येच दिले जाते. काही ठिकाणी जेवण प्लास्टिकच्या डब्यांतून दिले जाते. प्लास्टिकची भांडी आणि बाटल्या यांमधील जेवण जेवल्यास अन् पाणी प्यायल्यास कर्करोग होऊ शकतो. प्लास्टिक डब्यांतील BPA (Bisphenol A) हे रसायन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.

४ इ. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पावसाळ्यात नाले तुंबतात. पाणी साचून पुराची शक्यता बळावते.

५. प्लास्टिकवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न !

अ. काही शहरांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणामाची नोंद घेऊन प्लास्टिकवर नियंत्रण आणण्याचे नियम लागू केलेले आहेत.

आ. काही नगरपालिकांनी सुका कचरा आणि ओला कचरा असे वर्गीकरण केले आहे. यासाठी प्रत्येक घराला वेगवेगळ्या रंगांच्या कचर्‍याच्या बालद्या दिलेल्या आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या घालण्याचेही नियम आहेत. कचरा यंत्रणा हा कचरा ‘रिसायकलिंग’साठी (पुनर्वापरासाठी) पाठवतात. कचरा टाकण्याची व्यवस्थाही वेगवेगळी केलेली आहे. बायोडिग्रेडेबल (जैवविघटनशील) पिशव्या बाजारात उपलब्ध आहेत. त्या काही काळाने मातीमध्ये सहज मिसळतात.

इ. काही सदनिकांमध्ये ओल्या कचर्‍याचे खत सिद्ध करून तेथील बागेत ते वापरण्याची मोहीम चालू आहे. पुण्यासारख्या शहरात काही संस्था संगणकाचे साहित्य, उदा. माऊस, कीबोर्ड, मॉनिटर या इ-वेस्टचाही पुनरुपयोग करतात.

ई. कचर्‍याच्या रिसायकलिंगच्या माध्यमातून नवीन कपडे, जॅकेट, खेळणी, रस्ते यांसह अन्य वस्तू बनवल्या जातात.

उ. कच्चा माल वापरून उत्पादनाच्या निर्मितीपेक्षा पुनरुत्पादनासाठी अल्प ऊर्जा वापरात येते. यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन आणि जलप्रदूषण न्यून होते.

६. शासनाचे प्लास्टिकविरोधी प्रयत्न !

अ. शासनाने व्यापार्‍यांना स्वस्त प्लास्टिक पिशव्या न वापरता, पेपर, कापड किंवा जाड प्लास्टिक पिशव्या ज्या पर्यावरणासाठी हानीकारक नाहीत, अशा पिशव्या वापरण्याचे नियम चालू केले आहेत.

आ. शासनाने वर्ष २०२२ मध्ये एकदा वापरून टाकायच्या (वन टाइम युज) प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातली होती. १२० मायक्रॉनपेक्षा अल्प जाडी असलेल्या पिशव्यांवर बंदी होती. त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर दंड घालण्याची पद्धतही चालू केली; पण हळूहळू भ्रष्टाचारामुळे व्यापार्‍यांना सवलत दिली जाते आणि समाजाकडूनही कायद्याचे पालन होत नाही. देवाने दिलेला सुंदर निसर्ग आणि पर्यावरण टिकवून ठेवणे, हे समाजातील प्रत्येकाचे दायित्व आहे. प्लास्टिकचा न्यूनतम वापर करून पर्यावरणास अनुकूल अशा घटकांपासून बनलेल्या वस्तू वापरात आणायला हव्यात.

– डॉ. (सौ.) लिंदा बोरकर, फोंडा, गाेवा.

पर्यावरणाचे रक्षण कसे करावे ?

अ. दुकानदाराकडे पिशव्यांची मागणी न करता स्वत: कापडी पिशव्या समवेत नेणे

आ. शिजलेल्या अन्नासाठी प्लास्टिकची भांडी न वापरता तांबे, स्टील किंवा ग्लास यांची भांडी वापरणे. पिण्यासाठी प्लास्टिकऐवजी स्टीलच्या बाटल्या वापरणे.

इ. सार्वजनिक स्थळी प्लास्टिकची ताटे किंवा पेले न वापरता स्टीलची ताटे आणि पेले वापरावेत. पत्रावळी, केळीची पाने, तसेच, सुपारीच्या पानांपासून बनवलेले द्रोण, ताटे आणि भांडी वापरावीत. ती पर्यावरणपूरक आहेत.

ई. कचर्‍याचे वर्गीकरण करून योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावावी.

उ. शक्य असल्यास ओल्या कचर्‍याचे खत सिद्ध करावे.

ऊ. उपाहारगृहातून अन्न घ्यायचे असल्यास शक्यतो स्वतःची भांडी न्यावीत.

ए. दूध किंवा तेल यांच्या पिशव्या कापतांना पूर्ण तुकडा पिशवीपासून वेगळा न करता कात्रीने तेवढाच कापला, तर तशा असंख्य लहान तुकड्यांपासून होणारे प्रदूषण अल्प करता येऊ शकते.

नैसर्गिक वस्तूंतून सूक्ष्मातून चांगली स्पंदने प्रक्षेपित होतात. ती आपण ग्रहण करू शकतो. दैनंदिन जीवनात सात्त्विक वस्तूंचा उपयोग केल्यास आध्यात्मिक स्तरावरही आपल्याला लाभ होतो.

– डॉ. (सौ.) लिंदा बोरकर, फोंडा, गाेवा.