आजकाल मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, पालकांना काळजी वाटते की, घराबाहेर गेलेली मुलगी सुरक्षित परत येईल का ? ‘कुणा अनोळखी पुरुषाशी बोलायचे नाही. कुणी काही खायला दिले, तर खायचे नाही. कुणाला स्पर्श करू द्यायचा नाही’, असे काही पालक मुलींना समजावण्याचा प्रयत्न करतात; परंतु सर्वच मुली पालकांचे ऐकतात, असे नाही. काही पालक मुलींवर बंधने घालू शकतात; परंतु काही पालक मुलींवर बंधने घालू शकत नाहीत, तोपर्यंत त्या मोठ्या झाल्यावर हे सर्व करण्याची वेळ निघून गेलेली असते. लहानपणापासूनच मुलामुलींवर राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार केले, तर मुली मोठेपणी येणार्या अडचणींवर मात करण्यास सक्षम होऊ शकतात.
राजमाता जिजाऊंनी बालशिवबांना रामायण, महाभारत यांतील पराक्रमाच्या कथा सांगितल्या. त्यातूनच छत्रपती शिवराय घडत गेले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान आक्रमकांवर विजय मिळवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या काळी केवळ अशक्य असणारी गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली; कारण त्यांनी आई भवानीचे अधिष्ठान ठेवले. त्याचप्रमाणे आपण मुलींना प्रतिकाराची प्रेरणा घेण्यासाठी अशा कथा लहानपणापासून ऐकवल्या आणि ईश्वराचे अधिष्ठान ठेवण्याचे संस्कार त्यांच्यावर केले, तर त्यांच्यातील लढाऊवृत्ती वाढीस लागून धर्मांधांच्या विविध प्रकारच्या आक्रमणांपासून त्यांचे संरक्षण होईल. स्वराज्य सौदामिनी ताराराणी यांचे उदाहरण हे आजच्या मुलींना अवश्य द्यायला हवे. संभाजी महाराजांच्या बलीदानानंतर मोगलांनी रायगडाला जेव्हा वेढा घातला, त्या आधीच छत्रपती रामराजेंना त्यांनी जिंजीला पाठवले आणि स्वतः रणांगणात उतरून त्या मोगलांशी लढल्या. अशा शूर विरांगनांचा आदर्श आजच्या मुलींसमोर पालकांनी अवश्य ठेवायला हवा.
सध्या अनैतिकता आणि अत्याचार यांचे वाढलेले प्रमाण पहाता मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि आत्मिक बल वाढवण्यासाठी साधना अन् धर्माचरण यांचे धडे देणे अपरिहार्य आहे. साधनेने कुठल्याही प्रसंगाला तोेंड देण्याचे आत्मिक सामर्थ्य निर्माण होते. साधनेमुळे निर्माण होणार्या सूक्ष्म संरक्षणकवचामुळे मुलींचे रक्षण होण्यास साहाय्य होऊ शकते. मुलींचे आत्मिक आणि शारीरिक बळ वाढले, तर त्या कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास सक्षम होऊ शकतात. मुलींच्या मनावर अशा प्रकारे राष्ट्र आणि धर्म विषयक संस्कार करून त्यांना साधना अन् स्वरंक्षण यांचे धडे दिल्यास सध्याच्या असुरक्षित समाजात वावरण्यास मुली सक्षम होतील, यात शंका नाही.
– श्री. अमोघ जोशी, पुणे.