इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झालेल्या आणि आता अफगाणिस्तानच्या कारागृहात असलेल्या केरळच्या ४ महिलांना भारत परत आणणार नाही !

(डावीकडून) निमिषा उपाख्य फातिमा ईसा, सोनिया सॅबेस्टियन उपाख्य आयशा, रफाएला, मेरिन जेकब उपाख्य मरियम

नवी देहली – अफगाणिस्तानमध्ये जाऊन इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झालेल्या ४ भारतीय महिलांना भारतात परतण्याची अनुमती दिली जाणार नाही. ही माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. एका इंग्रजी दैनिकाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या महिला सध्या अफगाणिस्तानमधील कारागृहामध्ये आहेत. त्यांचे पती तेथे वेगवेगळ्या आक्रमणात ठार झाले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये या महिलांनी शरणागती पत्करली हाती. सोनिया सॅबेस्टियन उपाख्य आयशा, मेरिन जेकब उपाख्य मरियम, निमिषा उपाख्य फातिमा ईसा आणि रफाएला अशी त्यांची नावे आहेत.

अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाचे प्रमुख अहमद जिया सरज यांनी पूर्वी सांगितले होते की, १३ देशांतील इस्लामिक स्टेटचे ४०८ आतंकवादी अफगाणिस्तानच्या कारागृहात बंद आहेत. ४ भारतीय, १६ चिनी, २९९ पाकिस्तानी, २ बांगलादेशी, २ मालदीवचे आणि अन्य यांचा यात समावेश आहे.