केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची अनधिकृतपणे झडती घेणारे ५ पोलीस निलंबित !

पोलिसांनी कार्यालयात घुसून धारिका आणि अन्य साहित्य यांची नासधूस केल्याचा दानवे यांचा आरोप

  • केंद्रीय मंत्र्याच्या संदर्भात अशा प्रकारची अनधिकृत कृत्ये बिनधास्तपणे करणारे पोलीस सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! पोलिसांच्या अशा असभ्य वर्तणुकीमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास उडाला आहे. अशा पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !
  • पोलिसांची अशी दंडेलशाही समाजात अनेकांनी अनुभवली आहे ! असे पोलीस जनतेचे रक्षक नव्हे, भक्षकच होत. अशा पोलिसांचा सामान्यांना कधी आधार वाटेल का ?
  • याला कुणी ‘खाकी वर्दीतील गुंडगिरी’ असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालय

जालना – कोणताही गुन्हा नोंद नसतांना पोलिसांनी ११ जून या दिवशी दुपारी ४.४५ वाजता भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची अनधिकृतपणे झडती घेतली. यासह संबंधित पोलीस कर्मचार्‍यांनी कार्यालयातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचाही आरोप दानवे यांनी केला. त्यामुळे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती २ पोलीस उपनिरीक्षक आणि ३ पोलीस कर्मचारी यांना निलंबित केले. पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोलीस हवालदार मंगलसिंग सोळंके, सचिन तिडके आणि शाबान तडवी अशी त्यांची नावे आहेत.

याविषयी पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल म्हणाले, ‘‘भाजपच्या कार्यालयात आरोपी आहे, अशी माहिती मिळाल्याने कार्यालयात आम्ही गेलो. एका व्यक्तीला अमानुष मारहाण झाली होती. संबंधितांच्या कुटुंबियांनाही धोका होता. तणावग्रस्त वातावरण असल्यामुळे वरिष्ठांना माहिती देण्यास वेळ न मिळाल्यामुळे भाजपच्या कार्यालयात जावे लागले. (एरव्ही सीमेचे (हद्दीचे) कारण पुढे करून सर्वसामान्य नागरिकांची साधी तक्रारही प्रविष्ट करून न घेणारे पोलीस तत्परतेने अशी अनधिकृत कृती कशी करू शकतात ? सरकारने याची चौकशी केली पाहिजे ! – संपादक) आम्ही तेथे कुठल्याही धारिका (फाईल) फेकल्या नाहीत.’’

केंद्रीय मंत्री दानवे यांच्याकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

‘कायदेशीर आदेश नसतांना पोलिसांनी माझ्या कार्यालयात घुसून धारिका (फाईल) आणि अन्य साहित्य यांची नासधूस करणे, ही गोष्ट पूर्णत: अनधिकृत आहे. अन्वेषणात काय साध्य केले आणि काय निष्पन्न झाले ? याचा पोलीस विभागाने तात्काळ खुलासा करावा’, अशी लेखी मागणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे तक्रारीद्वारे केली.