सातारा – अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि पालिका मुख्याधिकार्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत. या प्रकाराची ‘ऑडिओ क्लिप’ प्रसारित झाली होती.
सध्या मंगळवार पेठेत भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. काम चालू असतांना एका इमारतीची संरक्षक भिंत जेसीबीच्या धक्क्याने कोसळली. भिंत बांधून देण्याचे संबंधित ठेकेदाराने मान्य केले; मात्र कामास विलंब झाल्याने सिद्धी पवार यांनी ठेकेदार, त्यांचे सहकारी आणि पालिका मुख्याधिकारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
माझा कायद्यावर पूर्ण विश्वास ! – बांधकाम सभापती सिद्धी पवार
सातारावासियांच्या भावना मी व्यक्त केल्या असून चालू असलेल्या कामाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रसारित झालेली ‘ऑडिओ क्लिप’ ही १ जून या दिवशीची आहे. यावरून सर्व नागरिकांनाही माझ्या कामाची तळमळ कळते आहे. लोकहितासाठी माझ्यावर कितीही गुन्हे नोंद झाले, तरी माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे, असे बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी म्हटले आहे.