गुजरातमध्ये ‘गाय संशोधन केंद्रा’ची स्थापना !

गायीचे दूध, शेण आणि गोमूत्र यांच्यावर संशोधन होणार

कर्णावती (गुजरात) – ‘गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ने (‘जी.टी.यू.’ने) ‘गाय संशोधन केंद्राचा’ प्रारंभ केला आहे. गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण यांच्या पारंपरिक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘कामधेनु संस्थे’ने या केंद्रासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

१. जी.टी.यू.चे कुलगुरु नवीन शेठ म्हणाले की, सध्या गायींविषयी केवळ भावनिक चर्चा होत असते. गायींवर अद्याप फारसे वैज्ञानिक कार्य हाती घेतलेले नाही. आम्ही वैज्ञानिक संशोधन आणि नवकल्पना यांच्या माध्यमांतून पारंपरिक ज्ञान समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

२. जी.टी.यू.चे प्रा. डॉ. संजय चौहान म्हणाले की, देशी गायींच्या गोमूत्रापासून औषधे आणि खते बनवण्याविषयी संशोधन करण्यात येत आहेे. या संशोधन केंद्राचा उद्देश ‘वैज्ञानिकदृष्ट्या गायींपासून मिळणार्‍या सर्व गोष्टींवर संशोधन करणे’, हा आहे. गोमूत्रामध्ये बर्‍याच प्रकारचे जीवाणू असतात. संशोधन आणि नवकल्पना यांच्या माध्यमांतून हे जीवाणू अनेक उपचारांमध्ये वापरले जाऊ शकतात. गोमूत्रच्या अर्कामध्ये औषधीमूल्य असून भूमीचे पुनरुत्पादन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे.