उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराच्या खाली आढळल्या जुन्या मूर्ती आणि भिंती !

खोदकामाच्या वेळी मिळालेल्या मूर्ती

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील सुप्रसिद्ध श्री महाकाल मंदिरात खोदकाम चालू असतांना शेकडो वर्षे जुन्या मूर्ती आढळून आल्या आहेत. यासह या मंदिराच्या गर्भात अनेक जुन्या भिंतीही दबलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात आले आहे. या मूर्ती आणि भिंती या ११ व्या किंवा १२ व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागातील तज्ञांचे मत आहे. खोदकामाच्या वेळी अन्यही ऐतिहासिक वस्तू आढळतील, अशी आशा पुरातत्व विभागाने व्यक्त केली आहे.

ही माहिती मिळाल्यानंतर पुरातत्व विभागाचे डॉ. रमेश यादव, डॉ. ध्रुवेंद्र सिंह जोदा, डॉ. राजेश कुमार आणि सर्वेक्षक योगेश पाल यांच्या ४ सदस्यीय पथकाने खोदकामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांनी ‘हे सर्व अवशेष शुंग वंशाच्या काळातील असू शकतात’, असा अंदाज वर्तवला. याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला देण्यात आली आहे.