‘आपत्काळ साधनेसाठी संपत्काळ आहे’, हे अनुभवता आल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या ठाणे येथील सौ. वैशाली सामंत (वय ७२ वर्षे)

‘हे गुरुमाऊली, दळणवळण बंदीच्या (लॉकडाऊनच्या) कालावधीत तुमच्या कृपेमुळेच सर्वत्र धर्मप्रसार होत आहे. तुम्ही आम्हाला आपल्या महान कार्यात सहभागी करून घेत आहात. गुरुमाऊली, तुम्ही गेल्या १८ ते २० वर्षांपासून येणार्‍या आपत्काळाविषयी सर्वांना सावध करत होता. दळणवळण बंदी चालू झाल्यापासून ‘आपण सांगितलेला आपत्काळ प्रत्यक्ष आला आहे; पण हा आपत्काळ साधनेसाठी संपत्काळ आहे’, हे अनुभवता येत आहे. याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. आपल्या आणि जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने या कालावधीत सेवा करतांना मला जे अनुभवायला मिळाले, ते आपल्या चरणी कृतज्ञता म्हणून अर्पण करत आहे.

सौ. वैशाली सामंत

१. दळणवळण बंदीच्या काळात घरी राहून केवळ भ्रमणभाषवर संपर्क केल्यावरही नेहमीपेक्षा अधिक पटींनी फलनिष्पत्ती मिळणे आणि त्यामुळे साधकांना आनंद मिळणे

गुरुपौर्णिमेनिमित्त ३ – ४ मास घरोघरी जाऊन अध्यात्मप्रसार करणे, अर्पण जमा करणे आणि ग्रंथ वितरण करणे या सेवा केल्यावर जेवढी फलनिष्पत्ती मिळत होती, त्याहून अधिक पटींनी फलनिष्पत्ती या वेळी घरी राहून केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून मिळाली. प्रतिदिन होणार्‍या ‘भगवंत भेट’ या सत्संगातून संतांंच्या माध्यमातून आपण आम्हाला साधना आणि प्रसार यांची दिशा देत आहात. त्यातून शिकून आमचे अल्पसे प्रयत्न होऊनही सर्वांना पुष्कळ पटींनी आनंद मिळत आहे.

२. संपर्कात नसलेले नातेवाईक आणि पूर्वीच्या मैत्रिणी यांचा संपर्क होणे, त्यांनी ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणे अन् त्यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांना मिळणारा आनंद पाहून कृतज्ञता वाटणे

‘गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे नातेवाईक आणि माझ्या पूर्वीच्या मैत्रिणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संस्थेशी जोडल्या गेल्या. त्यांची अन्य मार्गाने साधना चालू आहे. त्या देत असलेला प्रतिसाद आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रेम अनुभवता येऊन आनंदाची देवाणघेवाण होत आहे. गेली २० वर्षे मी ज्यांच्या संपर्कात नव्हते, त्यांचा आता संपर्क होऊन ते ‘यू-ट्यूब’वरून सत्संग ऐकत आहेत आणि संस्था सांगत असलेले नामजप करत आहेत. सत्संगाला आणि इतर उपक्रमांना जोडल्यामुळे त्यांना आनंद मिळत आहे. हे पाहून माझे मन कृतज्ञतेने भरून येते; कारण ही किमया केवळ तुम्हीच करू शकता.’

३. ‘ऑनलाईन’ अर्पण गोळा करतांना ‘देवाचे कार्य देवच करतो आणि अल्प प्रयत्न करूनही भरभरून आनंद देतो’, याविषयी आलेल्या अनुभूती 

३ अ. अर्पणाचे ध्येय ठरवतांना मनात नकारात्मक विचार येणे; परंतु प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा १० पट अधिक प्रतिसाद मिळणे : अर्पणाचे ध्येय ठरवतांना ‘मला बाहेर पडता येणार नाही आणि घरी कोण अर्पण आणून देणार ? ऑनलाईन अर्पण देतील का ?’, असे माझ्या मनात विचार येत होते; पण प्रत्यक्षात माझ्या अपेक्षेपेक्षा १० पट अधिक प्रतिसाद मिळाला. ‘देवाचे कार्य देवच करतो आणि अल्प प्रयत्न करूनही साधकांना भरभरून आनंद देतो’, हे मला अनुभवता आले.

३ आ. ‘ऑनलाईन’ अर्पण कसे घ्यायचे ?’, याविषयीचा अनुभव नसणे; परंतु अर्पणदात्यांनी इतरांचे साहाय्य घेऊन अर्पण देणे : या वर्षी घराबाहेर न पडता ‘ऑनलाईन’ अर्पण गोळा करायचे होते. मला यातील काही अनुभव नसतांनाही आपण ती सेवा माझ्याकडून करवून घेतलीत. काही वाचक आणि जिज्ञासू यांना ‘ऑनलाईन’ अर्पण देण्यात अडचण येत होती. त्या वेळी त्यांनी इतरांचे साहाय्य घेऊन मला अर्पण दिले. ‘अर्पण देवापर्यंत पोचायला हवे’, यासाठी त्यांनी केलेली धडपड पाहून ‘भगवंताचे भक्त कसे असतात ? भगवंत त्यांची इच्छा कशी पूर्ण करतो ?’, हे लक्षात येऊन मला आणि अर्पणदाते यांना आनंद अनुभवता आला.

४. आपत्काळासाठी उपयुक्त अशा ग्रंथांची मागणी घेतांना जिज्ञासूंकडून मिळालेला प्रतिसाद आणि देवाची अनुभवलेली कृपा

अ. मी लोकांना संपर्क करून त्यांना आपत्काळासाठी उपयुक्त अशा ५ ग्रंथांची माहिती सांगत होते. केवळ २ आठवड्यांत माझे ग्रंथांच्या मागणीचे ध्येय पूर्ण झाले; म्हणून मी ध्येय अजून वाढवले. त्यामुळे ७५ हून अधिक ग्रंथांची मागणी मिळाली. त्या वेळी ‘देवाच्या कृपेचा ओघ किती मोठा आहे ? देवालाच त्याच्या भक्तांना ग्रंथरूपी प्रसाद द्यायचा आहे. तो त्यासाठी आपल्याला माध्यम बनवत आहे’, हे लक्षात येऊन त्यातला आनंद घेता आला.

आ. मला जिज्ञासूंना निरपेक्षपणे ‘ग्रंथांत कोणती माहिती आहे ? त्याचा लाभ कसा होणार आहे ?’, हे सांगता येत होते. माझ्या मनात ‘केवळ त्यांच्या कल्याणाची इच्छा आहे’, हे देवाच्या कृपेने माझ्या बोलण्यातून व्यक्त होत होते.

इ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवारच्या अंकात आपत्काळ कसा असणार ? त्याची पूर्वसिद्धता कशी करावी ? यासंदर्भात लेखमाला प्रसिद्ध होणार आहे आणि त्याविषयी ग्रंथही येणार आहे’, याविषयी देवाने माझ्याकडून अगोदरच संपर्कातून सांगून घेतले. त्यामुळे आपत्कालीन ग्रंथ खंड १ आणि २ यांची मागणी सहज घेता आली.

‘गुरुमाऊली, आपण उपलब्ध करून दिलेल्या प्रतिदिनच्या सत्संगामुळे आम्ही साधनेत टिकून आहोत. अखेरच्या श्‍वासापर्यंत सेवेचे विचार देऊन सेवा करवून घ्यावी’, हीच आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’

– सौ. वैशाली सामंत, ठाणे (१६.८.२०२०)

दळणवळण बंदीच्या काळातही प्रत्येकापर्यंत साधना पोचवण्याची धडपड असल्याने सतत सेवारत असणार्‍या सौ. वैशाली सामंत यांची पू. (सौ.) संगीता जाधव यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (सौ.) संगीता जाधव

१. सतत सेवारत असणे

‘सौ. सामंत यांचे वय ७२ वर्षे असूनही त्या सतत सेवारत असतात. त्या केंद्रात दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतात. या सेवेतून त्यांना वेळ मिळेल, तशा त्या अन्य सेवाही करतात. वितरक म्हणून सेवा करतांना ग्रंथ वितरण करणे आणि वर्गणीदार बनवणे, अशा सेवाही त्या करतात.

२. दळणवळण बंदीच्या काळात सेवेत खंड पडू नये, यासाठी भ्रमणभाषवरील सुविधांचा वापर करण्यास शिकणे आणि अन्य साधकांच्या साहाय्याने सेवा पूर्ण करणे

त्यांना ‘भ्रमणभाषमधील काही सुविधांचा वापर कसा करायचा ?’, ते लक्षात येत नव्हते. दळणवळण बंदीच्या काळात सर्व सेवा ‘ऑनलाईन’ आणि भ्रमणभाषद्वारे करायच्या असल्यामुळे ‘सेवेत खंड पडायला नको’, यासाठी त्या केंद्रातील अन्य साधकांच्या साहाय्याने भ्रमणभाषचा वापर करून सेवा पूर्ण करतात. त्यांनी भ्रमणभाषवरून संपर्क करून ग्रंथांची मागणी घेतली. यातून त्यांची सेवेची तळमळ लक्षात येते.

दळणवळण बंदीच्या काळातही प्रत्येकापर्यंत साधना पोचवण्याची त्यांची सतत धडपड असते. या कालावधीत सामंतकाकूंनी पुष्कळ तळमळीने सेवा केली.

३. प्रेमभाव

त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्या प्रेमाने हाताळतात. त्यांची साधकांशी जवळीक आहे. काकू वयाने मोठ्या असल्या, तरी वितरक-मुलांनाही काकूंशी जवळीक वाटते. त्यांचा आधार वाटतो. त्यांनी त्यांच्या संपर्कातील जिज्ञासू आणि वाचक यांनाही चांगल्या पद्धतीने जोडून ठेवले आहे.

४. सामंतकाकू प्रत्येक गोष्ट तळमळीने आणि श्रद्धेने करतात. या काळात भगवंताने जे दिले आहे, याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– (पू.) सौ. संगीता जाधव, ठाणे (१६.८.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक