सोलापुरातील दळणवळण बंदीत ४ जूनपासून शिथिलता

सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने खुली रहाणार !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर – शहरातील दळणवळण बंदी उठवण्यासंदर्भात ३ जून या दिवशी सायंकाळी शासनाने महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रात्री दळणवळण बंदी शिथिल करण्याविषयी आदेश काढले आहेत. कोरोना संसर्गामुळे मागील दीड मासांहून अधिक काळ येथे दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती.

या आदेशानुसार ४ जून पासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सप्ताहातील सर्व दिवस चालू ठेवण्यास, तर अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. या दुकानांतील मालक आणि कामगार यांना कोविड चाचणी आणि लसीकरण बंधनकारक असणार आहे. अधिकोषांच्या कामकाजाची वेळही सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत करण्यात आली आहे. उपाहारगृहातून पार्सल सेवा सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत चालू रहाणार असून दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत त्यांना घरपोच सेवा देण्यास अनुमती देण्यात आली आहे.