सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या साहाय्याला पुन्हा एकदा आशा सेविका !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सातारा, २ जून (वार्ता.) – गावातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या साहाय्याला पुन्हा आशा सेविका आल्या आहेत. आशा सेविकांनी पुन्हा एकदा घराघरात जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे कार्य चालू केले आहे. गावात नव्याने आलेल्या आणि गृहविलगीकरणात असलेल्यांना ग्रामपंचायतीने उभारलेल्या विलगीकरण कक्षात पाठवण्याची प्राथमिक सिद्धता करण्यात आली आहे.

शहराहून अधिक ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार तीव्रतेने होत आहे. उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी केलेल्या सातारा दौर्‍यामध्ये आरोग्य विभागाला ग्रामस्तरावर योग्य त्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्ययंत्रणा सक्रिय झाली असून ग्रामस्तरावर आशा सेविकांचे साहाय्य घेतले आहे. आशा सेविका ग्रामीण भागात बाधितांच्या नोंदींसह त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. तसेच गावातील आजारी व्यक्ती आणि त्यांच्यावर चालू असलेले उपचार यांच्याही नोंदी ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावरील आरोग्ययंत्रणेवरील ताण अल्प करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.