कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस पुरेसा ! – बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाचे संशोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिली माहिती !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालय

वाराणसी (उत्तरप्रदेश) – कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांच्या शरिरामध्ये १० दिवसांतच आवश्यक अँटीबॉडीज निर्माण होत असल्याने त्यांना दुसर्‍या लसीची आवश्यकता नाही, असे महत्त्वाचे संशोधन बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या झूलॉजी विभागाच्या संशोधकांनी केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याविषयी माहितीही देत अशा व्यक्तींना एकच डोस देण्याचा सल्ला दिला आहे. हे संशोधन अमेरिकेतील जर्नल सायन्स इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यासाठी निवडण्यात आले आहे.

झूलॉजी विभागाचे प्रा. ज्ञानेश्‍वर चौबे, न्यूरोलॉजी विभागाचे प्रा. विजय नाथ मिश्रा आणि डॉ. अभिषेक पाठक यांच्या पथकाने हे संशोधन केले. प्रा. चौबे यांनी सांगितले की, २० व्यक्तींवर संशोधन केल्यावर ही गोष्ट लक्षात आली. सध्या देशात २ कोटी लोक कोरोनामुक्त झाले आहेत. अशा वेळी त्यांना केवळ एकच डोस दिला, तर लसींच्या तुटवड्यावर काही प्रमाणात मात करता येऊ शकते.