सातारा जिल्ह्यात लसीअभावी लसीकरण मोहिम रखडली !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सातारा, १ जून (वार्ता.) – गत २ दिवसांपासून जिल्ह्यात लस उपलब्ध झाली नसल्याने बहुतांश आरोग्य केंद्रांवरील लसीकरण मोहिम रखडली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांवरील फाटकांवर ‘लसीकरण बंद’चे फलक झळकत आहेत. मेमध्ये लसीचा साठा अल्प झाल्यामुळे पूर्ण लसीकरण मोहिमच रखडल्याचे जाणवते.

जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र जिल्ह्यात लसीचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी कोव्हिशिल्ड ३ सहस्र ९००, तर कोव्हॅक्सिन ४ सहस्र ६४० लसीचे डोस उपलब्ध झाले होते; मात्र नागरिकांची लसीकरण केंद्रांवरील गर्दी पहाता हे डोस एकाच दिवसात संपले. प्रारंभी दिवसभरातील लसीकरण सत्रांची संख्या मोठी होती; मात्र आता ती लसीच्या तुटवड्यामुळे अल्प करण्यात आली आहे. जिल्ह्याला लसीचा साठा अधिकाधिक मिळावा, यासाठी प्रयत्न चालू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.