दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदतीपासून वंचित रहावे लागल्याने जुन्नरच्या तहसीलदारांना नोटीस !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

जुन्नर – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तहसीलदारांच्या हलगर्जीपणामुळे मदतीपासून वंचित रहावे लागल्याने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी २ जून या दिवशी उपविभागीय कार्यालयात हजर राहून लेखी खुलासा करण्याची नोटीस ( सूचना ) प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली आहे. जुन्नर तालुक्यातील ९ पैकी ६ दुष्काळी महसूल मंडलात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ पडला होता. त्यातील बाधित शेतकऱ्यांना सरकारी निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यासंदर्भातील माहिती कळविण्याचे आदेश होते; मात्र तहसीलदार आणि संबंधित अधिकारी यांनी याविषयी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याने हलगर्जीपणाचा ठपका ठेवून तहसिलदारांचे निलंबन करण्यात यावे आणि इतर दायित्व असणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर यांनी २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही नोटीस दिली आहे.