शेतकर्‍याने २ वर्षांपासून बंदिस्त केलेल्या ९ ऊसतोड कामगारांची बादलेवाडी (जिल्हा सोलापूर) येथून सुटका

प्रतिकात्मक चित्र

जालना – शहरातील गांधीनगर भागातील मारिया घुले या ऊसतोड कामगार कुटुंबास गेल्या २ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बादलेवाडी येथील शेतकरी आणि ऊसतोड गुत्तेदार भरत आलदार यांनी बंदिस्त केले होते. यापैकी एका महिलेने दवाखान्याचे निमित्त करून जालना येथे येऊन या घटनेची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांना दिली. त्यांनी तत्परतेने पोलीस प्रशासनाला याविषयी माहिती देऊन २४ घंट्यात या कुटुंबाची शेतकर्‍यांच्या तावडीतून सुटका केली. २२ मे या दिवशी हे कुटुंब येथील पोलीस ठाण्यात येताच आमदार कैलास गोरंट्याल यांसह पोलीस अधिकारी यांनी पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले.

१. मारिया घुले या आपल्या कुटुंबासह २ वर्षांपूर्वी बादलेवाडी येथे ऊस तोडणीसाठी गेल्या होत्या.

२. आरोपी भरत आलदार यांनी घुले कुटुंबियांचा विश्‍वासघात करून त्यांना स्वत:चे सासरे दिगंबर माने यांच्या शेतात डांबून ठेवले.

३. प्रतिमास त्यांना केवळ ४०० ते ५०० रुपये दिले जात होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेल्या २ वर्षांपासून हे ऊसतोड कामगार येथे बंदिस्त होते.

४. या घटनेपूर्वी या कामगारांसमवेत ऊसतोडणीविषयीचा ६ मासांचा करार झाला होता; मात्र करार होऊन पैसे मिळाल्यानंतरही आलदार यांनी या कुटुंबाला करारातून मुक्त न करता शेतामध्ये डांबून ठेवून त्यांच्यावर अन्याय केला होता.

५. याविषयी मारिया घुले म्हणाल्या की, आता ऊस तोडीला जाणार नाही. गेल्या २ वर्षांत आलेला अनुभव हा अत्यंत विदारक आहे. शेतमालकाने केलेला अन्याय आणि अत्याचार हे सहन होत नव्हते.