खंडित वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी वीज खात्याकडून अथक प्रयत्न
पणजी, १८ मे (वार्ता.) – १६ मे या दिवशी झालेल्या तौक्ते या चक्रीवादळामुळे ठिकठिकाणी कोसळेलेले वृक्ष आदीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत् चालू करणे, हे वीज खात्याच्या कर्मचार्यांसमोर मोठे आव्हान होते. वीज खात्याच्या कर्मचार्यांनी युद्धपातळीवर काम करून ४८ घंट्यांत राज्यातील ८० टक्के वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात यश मिळवले आहे. उर्वरित २० टक्के वीजपुरवठा १९ मेपर्यंत पूर्ववत् होेईल. या वादळामुळे वीज खात्याची २५ कोटी रुपयांची हानी झाली आहे.
वीज खात्याचे कर्मचारी अथक काम करत आहेत. वीज खात्याच्या अल्प दाबाच्या विद्युतवाहिनीचे जवळजवळ ७०० ते ८०० खांब मोडले आहेत, तर उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे १०० हून अधिक खांब मोडले आहेत. वीजपुरवठा करणारी ३० हून अधिक ट्रान्सफॉर्मर केंद्रे निकामी झाली, तर २०० ट्रान्सफॉर्मर केंद्रे नादुरुस्त झाली आहेत. याशिवाय ३३ केव्हीए या उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे वादळामुळे पडलेले ४ ते ५ मनोरे (टॉवर) उभारण्याचे कामही वीज खात्याने चालू केले आहे.
कोसळलेले वृक्ष कापण्यासाठी अग्नीशमन खात्याशी झाला १ सहस्र ३८७ जणांचा संपर्क
१६ मे या दिवशी झालेल्या तौक्ते या चक्रीवादळामुळे राज्यातील मुख्य रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, घरे, बागायती इत्यादी ठिकाणी वड, निलगिरी, गुलमोहर, फणस, चिंच वगैरे अनेक प्रकारची झाडे कोसळली. यामुळे अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांना धावपळ करावी लागली. झाडे कोसळल्यामुळे जवळपास १ कोटी ११ लाख रुपयांच्या संपतीची हानी झाली आहे.