५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागपूर येथील चि. श्रीयश संतोष बाकरे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीयश संतोेष बाकरे हा आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. श्रीयस बाकरे याचा १९.५.२०२० या दिवशी तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

चि. श्रीयश बाकरे

चि. श्रीयश संतोष बाकरे यास वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. लग्नानंतर थायरॉईडच्या त्रासामुळे ३ वर्षे गर्भधारणा न होणे, त्यासाठी औषधोपचार केल्यावर गर्भधारणा होऊन मुलगी होणे आणि त्यानंतर थायरॉईडच्या गोळ्या घेणे बंद करणेे : ‘लग्नाला ३ वर्षे होऊनही मला मूल झाले नाही. तेव्हा वैद्यांनी मला ‘थायरॉईड’ची चाचणी (टेस्ट) करायला सांगितली. चाचणीत मला थायरॉईडचा त्रास असल्याचे लक्षात आले. त्यासाठी औषधोपचार केल्यावर २ मासांनी मला दिवस गेले आणि मुलगी झाली. माझी ही मुलगी ९ वर्षांची आहे. त्यानंतर मी थायरॉईडच्या गोळ्या घेणे बंद केले होते.

१ आ. एक दिवस पाण्याचा कॅन उचलल्यानंतर रक्तस्राव होणे, आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर गर्भधारणा झाल्याचे समजणे  : काही वर्षानंतर अचानक माझी मासिक पाळी थांबली. तेव्हा अडीच मास झाले होते. एकदा सकाळी पाण्याचा कॅन उचलल्यामुळे रक्तस्राव झाला. तेव्हा आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर ‘दिवस गेले आहेत’, असे कळले. रक्तस्राव थांबण्यासाठी आधुनिक वैद्यांनी औषध दिले आणि ते म्हणाले, ‘‘गर्भाची वाढ झाली तर ठेवूया; नाहीतर तो काढून टाकावा लागेल.’’ ईश्‍वराच्या कृपेने गर्भाची वाढ होऊ लागली.

२. गरोदरपणी

२ अ. गर्भारपणात कोणताही त्रास न होणे, प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि रामरक्षा म्हणण्यास आवडणे : मला गरोदरपणात नऊ मास काहीच त्रास झाला नाही. मला सतत उत्साह असायचा. मला रामरक्षा म्हणायला आवडायची. आईने सांगितल्यानुसार मी पोटावर हात ठेवून रामरक्षा म्हणायचे आणि नामजप करायचे. तेव्हा मला शांत वाटत असे. मला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणायला आवडायची. मला दिवस रहाण्याच्या आधीपासून लाड-कारंजा येथील देवस्थानाला जाण्याची पुष्कळ इच्छा होती; पण मी जाऊ शकले नाही. ‘गुरूंच्या कृपेने सर्व व्यवस्थित होणार’, असे मला आतून वाटत होते.

२ आ. स्वप्नाच्या माध्यमातून कुटुंबियांना मिळालेल्या पूर्वसूचना

१. चि. श्रीयशच्या वेळी गर्भधारणेच्या काही मास आधी माझ्या लहान जावेला मला मुलगा झाला असल्याचे स्वप्न पडले. त्यानंतर लगेच काही दिवसांतच मला दिवस गेल्याचे कळले.

२. माझ्या दुसर्‍या जावेलाही एक स्वप्न पडले. त्यात मला ९ वा मास चालू असून आम्ही सर्व जण एका मेळ्यात गेल्याचे तिला दृश्य दिसले. तिथे मी उंच पाळण्यात बसले असतांना त्यातून खाली पडले आणि मला कमरेला लागले. ‘मला किती लागले आहे’, हे बघण्यासाठी ती खाली वाकली. तेव्हा तिला माझ्या कमरेवर बेलाचे पान पडल्याचे दिसले. (मला या स्वप्नाचा अर्थ कळला नाही.)

३. ‘थायरॉईडची औषधे बंद असतांना गर्भधारणा होऊ शकत नाही’, असे मला वाटत होते; पण हा एक दैवी चमत्कारच आहे.

४. नऊ मास पूर्ण झाल्यानंतर वैशाख शुक्ल पक्ष सप्तमीला, म्हणजे ७ मे २०१८ या दिवशी (परात्पर गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या दिवशी) हे गोंडस बाळ जन्माला आले. त्याची आणि परात्पर गुरुदेवांची रासही एकच आहे.

३. जन्मानंतर

३ अ. जन्मानंतर ५ व्या दिवशी बाळाला कावीळ झाल्याचे निदान होणे, काचेच्या पेटीत ठेवल्यावर ते पुष्कळ रडणे आणि गुरुकृपेने दुसर्‍या दिवशी अहवाल सामान्य आल्याने बाळाला घरी आणणे : श्रीयशच्या जन्मानंतर ५ व्या दिवशी आधुनिक वैद्यांना शंका आल्यामुळे त्यांनी त्याचे रक्त तपासले. तेव्हा त्याला अधिक प्रमाणात कावीळ झाल्याचे निदान झाले. त्याला लहान मुलांच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. त्याला काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर तो पुष्कळ रडायचा आणि जवळ घेतल्यावर शांत रहायचा. त्याचे रडणे आम्हाला बघवत नव्हते. आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करत होतो आणि गुुरुकृपेने दुसर्‍या दिवशी रक्ताची तपासणी केली असता अहवाल सामान्य (नॉर्मल) आला आणि आम्ही बाळाला घरी आणले.

४. वय १ ते ४ मास

अ. चि. श्रीयश पुष्कळ शांत आहे. तो सहसा रडत नाही. झोप आली आणि भूक लागली, तरच तो थोडा रडतो आणि लगेच शांत होतो.

आ. झोपेत त्याच्या हातांच्या वेगवेगळ्या मुद्रा केलेल्या आढळतात.

५. वय ५ ते ७ मास

५ अ. हालचालीतील प्रगती : श्रीयश अडीच मासांचा असल्यापासून (गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून) पालथा पडायला लागला. तो ५ व्या मासात रांगायला लागला. ७ मास पूर्ण झाल्यापासून तो पकडून उभा रहायला लागला आणि ११ व्या मासांपासून तो आधार सोडून चालायला लागला.

६. वय ८ ते ११ मास

६ आ. सात्त्विक गोष्टींची आवड

१. श्रीयशला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने पुष्कळ आवडतात.

२. श्रीयश १० मासांचा असतांना आम्ही सर्व जण गाणगापूर येथे दर्शनासाठी गेलो होतो. होळी पौर्णिमा असल्याने मंदिरात पुष्कळ गर्दी होती. आम्ही रांगेत १ घंटा उभे राहिलो; पण त्याने मुळीच त्रास दिला नाही.

३. एकदा आम्ही श्रीयशला घेऊन पुणे येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही दर्शन घेऊन बाहेर बसलो असता आरतीची वेळ झाली. तेव्हा तो आरती संपेपर्यंत सतत टाळ्या वाजवत होता. त्याला हे कुणीही सांगितले नव्हते.

४. त्याला नमस्कार करण्यास सांगितले असता तो भूमीवर डोके टेकवून नमस्कार करतो.

५. श्रीयश ११ मासांचा झाल्यापासून प्रतिदिन त्याच्या वडिलांसमवेत अंघोळ करतो. त्याचे वडील पूजा करतात. त्या वेळी तो त्यांच्या मांडीवर पूजा होईपर्यंत बसून रहातो. आरतीची घंटा वाजली की, तो कुठेही असला, तरी लगेच देवघरात जातो. ’

– सौ. कविता संतोष बाकरे (श्रीयशची आई)

६. ‘श्रीयश आमच्या घरी आल्यानंतर त्याला देवघरापाशी नेले की, तो लगेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे झुकतो.’  श्रीमती चित्रा खटी (श्रीयशची आजी)

बाळाची वैशिष्ट्ये लक्षात आणून दिली आणि ती लिहून घेतली, यासाठी श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. कविता संतोष बाकरे, नागपूर (९.६.२०१९)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.