‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोव्यात वीज खात्याची मोठ्या प्रमाणावर हानी

  • मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचा आढावा

  • ७०० हून अधिक वीज खांब कोलमडून पडले, तर २०० ते ३०० ट्रान्सफॉर्मर्सची हानी

लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोव्यात झालेली हानी

पणजी, १७ मे (वार्ता.) – गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यात झालेल्या हानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १७ मे या दिवशी संबंधित शासकीय अधिकारी, संबंधित मंत्री आणि खात्याचे प्रमुख यांच्यासमवेत एक ‘व्हर्च्युअल’ बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश संबंधित खात्यांना दिले आहेत.

उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘चक्रीवादळामुळेे सुमारे ७०० वीजखांब मोडून पडले आहेत, तर विजेचे सुमारे २०० ते ३०० ट्रान्स्फॉर्मरांना हानी पोचली आहे. उच्चस्तरीय बैठकीत चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचा सविस्तर आढावा घेणे, तसेच जीवनावश्यक सेवा तत्परतेने सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे, यांसाठी सर्व खात्यांच्या प्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत. सर्व हमरस्ते १७ मेपर्यंत वाहतुकीसाठी मोकळे होतील, तर ग्रामीण भागात वीजपुरवठा १८ मेपर्यंत सुरळीत होणार आहे. पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा १८ मेपर्यंत सुरळीत होणार आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचा अहवाल केंद्राला पाठवून यासाठी केंद्राकडून साहाय्य घेतले जाणार आहे.’’

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खात्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे

आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून हानीभरपाई देणार

चक्रीवादळामुळे कृषी उत्पादन नष्ट झालेल्यांना, तसेच घर आणि वाहन यांची हानी झालेल्यांना आपत्कालीन व्यवस्थापन निधी अन् मुख्यमंत्री साहाय्य निधी यांमधून हानीभरपाई देण्यात येणार आहे. संबंधितांनी यासाठी धीर धरला पाहिजे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

चक्रीवादळाचा गोमेकॉवर विशेष परिणाम झाला नाही

चक्रीवादळामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) आणि इतर रुग्णालये यांना मोठी हानी पोचलेली नसल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. चक्रीवादळामुळे गोमेकॉ रुग्णालय आणि गोमेकॉचा सूपर स्पेशालिटी विभाग यांमध्ये पाणी शिरल्याच्या वृत्ताविषयी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘चक्रीवादळाची भीषणता पहाता अशा लहानसहान घटना घडणारच. सूपर स्पेशालिटी विभागाच्या खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे आत पाणी साचले.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून केंद्राचे सर्वतोपरी साहाय्य देण्याचे आश्‍वासन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला संपर्क साधून तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीविषयी माहिती जाणून घेतली. याप्रसंगी केंद्रशासनाचे सर्वतोपरी साहाय्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तत्पूर्वी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी हानीविषयी चर्चा केली. गोमंतकियांना आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.’’

भ्रमणभाषची नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी ‘इंट्रा-सर्कल रोमिंग’ सुविधा कार्यान्वित

चक्रीवादळामुळे झालेल्या हानीमुळे अनेकांना भ्रमणभाषच्या नेटवर्कची अडचण निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ‘इंट्रा-सर्कल रोमिंग’ सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आता प्रत्येक जण त्याच्या भ्रमणभाषमध्ये असलेल्या ‘मॅन्युअल सेटींग्स’च्या आधारे तो वास्तव्यास असलेल्या विभागात कार्यान्वित असलेले कोणतेही नेटवर्क निवडू शकणार आहे.’’