देहविक्री करणार्‍या महिलांच्या सरकारी मदत योजनेत घोटाळा झाल्याचे उघडकीस !

समाजातील काही घटकांची नीतिमत्ता किती रसातळाला गेली आहे याचे हे मूर्तिमंत उदाहरण. स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अत्यंत खालच्या थराला गेलेल्या सदस्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई होणे आवश्यक !

पुणे – देहविक्री करणार्‍या महिलांना देण्यात आलेल्या राज्य सरकारी आर्थिक मदत योजनेत गोरगरीब आणि कष्टकरी महिलांची नोंदणी करून सरकारची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शासनाने देहविक्री करणार्‍या महिलांची कोरोना काळात उपासमार होऊ नये होऊ नये यासाठी त्यांच्याकडून कोणतेही ओळखपत्र न घेता अनुदान वाटप करण्याचे आदेश दिले होते. या महिलांची यादी बनवण्याचे काम ‘कायाकल्प’ संस्थेला दिले होते, मात्र या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी संगनमत करून कट रचला. राज्यसरकारने एका मासाचे ५ सहस्र याप्रमाणे ३ मासाचेे १५ सहस्र रुपये काही महिलांच्या खात्यात केले; पण आरोपींनी या महिलांकडून त्यातील १० सहस्र रुपये घेऊन स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतला. नायब तहसीलदार सिद्धेश भटकर यांच्या तक्रारीनुसार गौरी गुरुंग, सविता लष्करे आणि कायाकल्प संस्थेच्या अन्य काही सदस्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

मागील आठवड्यात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन शहरात या योजनेत अपप्रकार झाल्याने कारवाईची मागणी केली होती.