संयुक्त उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ शिवसेना (कोल्हापूर) यांच्या वतीने निवेदन
कोल्हापूर, १२ मे (वार्ता.) – केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रथम ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला. यानंतर १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण घोषित करण्यात आले. यात लसींचा तुटवडा आणि योग्य नियोजन यांअभावी लसीकरण कार्यक्रमाचा अक्षरश: बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. अनेक लसीकरण केंद्रांवर सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असून लसीकरण केंद्रातील गर्दीमुळेच कोरोना होण्याचा धोका निर्माण होतो कि काय ? अशी स्थिती आहे. हे लसीकरण केवळ ‘ऑनलाईन’ नोंदणी करणार्यांसाठी आहे; मात्र ज्यांच्याकडे भ्रमणभाष नाही त्यांचे काय ? आरोग्य सेतूवर नोंदणी होत नसल्याने नागरिक हेलपाटे मारत आहेत.
तरी लसीकरणाच्या संदर्भातील गोंधळ थांबवावा, या मागणीचे निवेदन संयुक्त उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे यांच्या पुढाकाराने जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांना देण्यात आले.
जिल्हा लसीकरण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक लसीकरण केंद्रावर माहिती देण्यासाठी आणि ‘ऑनलाईन’ नोंदणी करण्यासाठी जनसंपर्क कर्मचारी नेमावा. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय असावी. अनेक नागरिक रांगेत उभे असतानाच ‘लस संपली आहे’, असे सांगण्यात येते म्हणून प्रत्येक केंद्रावर प्रत्येक विभागासाठी किती लस उपलब्ध आहे, त्याची माहिती सांगावी आणि तेवढ्याच लोकांना ‘टोकन’ द्यावे. या वेळी सर्वश्री सनी अतिग्रे, सुरेश कदम, राकेश पोवार, अनंत पाटील, सागर कलकुटगी यांसह अन्य उपस्थित होते.