रामजन्मभूमी मुक्त होणे, हे प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाचे प्रमाणच ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !

मुंबई – भारताच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रामजन्मभूमी श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी मुक्त करण्यात आली. प्रभु श्रीराम यांचे अस्तित्व होते, याचे हे एक प्रकारे प्रमाणच आहे. साम्यवादी विचारसरणीच्या लोकांना प्रभु श्रीराम अस्तित्वात होते, याचे आणखी कसले प्रमाण हवे ? ज्यांच्या जीवनपद्धतीतून धर्म नष्ट झाला आहे, ते ‘कम्युनिस्ट’ (साम्यवादी) आहेत. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला ‘देव कुठे आहे ?’, असे विचारून भगवान नारायणाच्या अस्तित्वाचे प्रमाण मागितले. सत्ययुगात भगवंताच्या अस्तित्वाचे प्रमाण द्यावे लागले. आज कलियुगातही प्रमाण द्यावे लागणार आहे. ईश्वर वर्तमानातच आहे, हे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी लक्षात घ्यायला हवे. आजच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या घरीही प्रभु श्रीरामाच्या मूर्ती आणि प्रतिमा दिसतील. हे लोक आतून श्रीरामाला मानतात; परंतु बाह्यत: दुष्प्रचार करतात. सीताराम येच्युरी या डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीच्या नावात ‘राम’ आहे. जर ते खरेच श्रीरामाला मानत नसतील, तर त्यांनी स्वत:चे नाव पालटावे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशमधील ‘अयोध्या संत समिती’चे महामंत्री महंत पवनकुमारदास शास्त्रीजी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष संवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी इतिहास अभ्यासक मीनाक्षी शरण आणि समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे हे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. हा कार्यक्रम ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून १० सहस्रांहून अधिक जणांनी ‘ऑनलाईन’ पाहिला.

भगवान श्रीराम साम्यवाद्यांचाही उद्धार करतील ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी

महंत पवनकुमारदास शास्त्रीजी

रावणाला प्रभु श्रीराम हे भगवंत आहेत, हे समजले होते. या भयानेच तर त्याला स्वप्नातही राम दिसत असे. स्वत:च्या मुक्तीसाठी रावणाने प्रभु श्रीरामांचे स्वरूप समजूनही त्यांच्याशी शत्रुत्व पत्करले. द्वेषाने का होईना, रावणाने श्रीरामाचे नाव घेतल्याने त्याचा उद्धार झाला; मात्र स्वत:च्या मुक्तीसाठी धडपडणार्‍या साम्यवाद्यांचाही भगवान श्रीराम उद्धार करतील.

प्रभु श्रीरामांनी मांस भक्षण केले, हा संपूर्णत: खोटा दुष्प्रचार आहे !

प्रभु श्रीरामांनी कस्तुरी मृगाची शिकार केली नाही, तर मारीच राक्षसाचा मायावीपणा उघड केला. हनुमानाने सीतामातेला सांगितले आहे, आपल्या वियोगात असतांना प्रभु श्रीरामांनी मध आणि उडीद यांचे सेवनही केले नाही. पर्वतीय क्षेत्रांत मध आणि उडीद हा ऋषिमुनींचा आहार असे. प्रभु श्रीरामांनी मांस भक्षण केले, हा संपूर्णत: खोटा दुष्प्रचार आहे.

विदेशात रामायणाचा अभ्यास होतो; पण भारतात त्याची उपेक्षा होते ! – मीनाक्षी शरण

मीनाक्षी शरण

१. धर्म आणि शास्त्र यांना आपण जिज्ञासू वृत्तीने समजून घ्यायला हवे. भारताबाहेर थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया या देशांत आजही प्रभु श्रीरामांची स्मृतीचिन्हे, रामायणातील कथांचे चित्रण पदोपदी आढळते. या देशांतील अभ्यासक्रमातही रामायण समाविष्ट केले आहे. प्रभु श्रीराम आपल्या देशात होऊन गेले, तरी अन्य देशांनी त्यांचे स्मरण ठेवले आहे. भारतात मात्र रामायणाची उपेक्षा होते.

२. मलेशिया हा एक इस्लामिक देश असूनही तेथे एखादी मशीद उभारायची असेल, तरीही ‘श्रीरामाच्या आज्ञेने’ असे म्हणून प्रभु श्रीरामांची स्वाक्षरी असते. तेथे आजही मंत्रीपदाची शपथ घेतांना श्रीरामाच्या पादुका आणि त्याच्या चरणांच्या धूलिकणांची शपथ घेतली जाते. इंडोनेशिया येथे ३०० हून अधिक कलाकार रामायणाचा ‘बॅले’ सादर करतात, तसेच तेथील भिंतींवर रामायण कोरलेले आहे. बाली येथे घराघरांत, सार्वजनिक ठिकाणीही राम, अर्जुन आणि समुद्रमंथन यांच्या कलाकृती आहेत. थायलंडमध्ये तेथील राजे स्वतःच्या नावाच्या आधी ‘राम’ असे नाव लावत. तेथील शाळा-महाविद्यालयात रामायण शिकवले जाते आणि हिंदुस्थानात मात्र रामाच्या अस्तित्वाविषयी पुरावे मागितले जातात.

३. प्रभु श्रीरामांना मानणार्‍या देशांमध्ये आजही स्त्रिया रात्री-अपरात्री निर्भयपणे वावरतात. मी स्वत: हा अनुभव घेतला आहे. जिथे पदोपदी श्रीरामांची स्मृतीचिन्हे आहेत, तेथे रामराज्य आल्याचाच अनुभव होणार. याउलट भारतात ठिकठिकाणी निजामुद्दीन, सुलतान, बाबर, मेकॉले यांचे उदात्तीकरण आढळते. मशिदी आढळतात. अशा ठिकाणी रामराज्याचा अनुभव कसा येणार ? महिला निर्भयपणे कशा वावरू शकणार ?

४. रावणदहनाला विरोध, प्रभु श्रीरामांविरोधात दुष्प्रचार करणे, हे इस्लामी, साम्यवादी आणि पाश्चात्त्य देश यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी रचलेले षड्यंत्र आहे. केवळ अन्य धर्मीयच नाही, तर आजच्या पिढीतील काही हिंदूही इतिहास ठाऊक नसल्याने असा विरोध करतात. तो समजून घेण्यासाठी हिंदूंनी आपल्या धर्माचा अभ्यास केला पाहिजे. प्रभु श्रीरामांनी आदर्श जगणे कसे असावे ? हे शिकवले. त्यांचे अनुसरण करून प्रत्येकाने रामभक्ती केली, तर आजच्या पिढीला सत्य इतिहास ज्ञात होईल.

समाजाने धर्माचरण केल्यास आजही महिलांना रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल ! – नरेंद्र सुर्वे

नरेंद्र सुर्वे

आज आपल्या निधर्मी देशात राममंदिर जरी उभारले जात असले, तरी देशात मंदिरातील मूर्तींची तोडफोड, हिंदु युवतींची गोळ्या घालून हत्या, लव्ह जिहाद, आतंकवाद, युवकांची व्यसनाधीनता, गोहत्या, कोरोना महामारीत रुग्णांची लूटमार चालूच आहे. गेल्या ७४ वर्षांत जनतेला धर्माचरण न शिकवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याउलट रामराज्यात सर्वजण सुखी होते; कारण सर्वजण धर्माचरणी, परोपकारी आणि मर्यादांचे पालन करणारे होते. त्यामुळे त्यांना भगवान श्रीरामासारखा आदर्श राजा मिळाला. रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती. त्यामुळे रात्री १२ वाजताही महिला अलंकार परिधान करून एकट्या वावरू शकत होत्या. आज पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केले जात आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. दुपारी १२ वाजताही महिलांना घराबाहेर पडणे असुरक्षित वाटते. आपल्यालाही श्रीरामासारखा आदर्श राजा हवा असेल, तर आपल्यालाही धर्माचरण आणि साधना करायला हवी. तसे झाले तर केवळ श्रीराम मंदिराचे निर्माणच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर ‘रामराज्य’ आणि रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल.

प्रभु श्रीरामांनी विशिष्ट जातीवर अन्याय केला, हा दुष्प्रचार !

प्रभु श्रीरामांनी विशिष्ट जातीवर अन्याय केला, हा दुष्प्रचार आहे. वनवासात असतांना प्रभु श्रीरामांनी सर्व जातींतील व्यक्तींशी स्नेहपूर्ण वर्तन केले. राजा निषाद, मातंग ऋषींची शिष्या आणि भिल्लीण शबरी, नावाडी केवट ही याची उदाहरणेच आहेत. विश्वामित्र ऋषींनी यज्ञान विघ्ने आणणार्‍या राक्षसांपासून रक्षण होण्यासाठी श्रीरामांचे साहाय्य मागितले होते. प्रभु श्रीराम वनवासी होऊन त्यांच्याकडे गेले. तेथे त्यांनी भिल्ल, गोंड, कोड आदी जमातींचे संघटन करून राक्षसांचा वध केला. नंतर १४ वर्षांच्या वनवासातही प्रभु श्रीरामांनी वानरांचे संघटन केले. त्यांच्याशी स्नेहपूर्ण, बंधुभावाचे वातावरण निर्माण केले; परंतु हा सत्य इतिहास सांगितला जात नाही. हिंदूंना जातीजातींमध्ये विभागण्याचे हे षड्यंत्र आहे. गेल्या ७४ वर्षांपासून भारतात इंग्रजांनी रुजवलेल्या ‘तोडा आणि फोडा’ या न्यायाने राज्य केले गेले. या दुष्प्रचारात त्यांनी प्रभु श्रीरामांनाही सोडले नाही.

जिज्ञासूंचे अभिप्राय

  • देवराज राका – आपला सत्य इतिहास अभ्यासक्रमात अंतर्भूत करायला हवा. सर्व हिंदूंनी ही मागणी करायला हवी.
  • डॉ. राजेंद्र गावसकर – सर्व जिवांनी श्रद्धापूर्वक साधना आणि सनातन धर्माने सांगितलेले दैनंदिन सात्त्विक आचरण केल्यास हिंदु राष्ट्र यायला वेळ लागणार नाही.