पुणे – राज्यभरात अनुमाने ११ सहस्र १५० सार्वजनिक ग्रंथालये असून त्यात २० सहस्र ३२१ कर्मचारी काम करत आहेत. सरकारने वेळेवर अनुदान द्यावे. कर्मचार्यांच्या वेतनासाठी वेगळे अनुदान चालू करावे, अशी मागणी ग्रंथालय कर्मचार्यांनी केली आहे. (ग्रंथालय कर्मचार्यांना नियमित वेतन मिळण्यासाठी त्यांना अनुदानही नियमित मिळायला हवे, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ! – संपादक) शहरी भागातील ग्रंथालयात वर्षभरात ३ लाख ७ सहस्र रुपयांचे अनुदान मिळते. त्यातील रक्कम कर्मचार्यांच्या वार्षिक वेतनावरच खर्च होते; मात्र कर्मचार्यांना मिळणारे वेतन हे अल्प असून वेतन वेळेवर मिळत नसल्याने ग्रंथालय कर्मचार्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने कर्मचार्यांचा विचार करून त्यांना महागाई भत्ता द्यावा किंवा वेतनासाठी ग्रंथालयांना वेगळे अनुदान चालू करावे अशी मागणी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी केली.