‘पुणे सार्वजनिक सभा, पुणे’चा १५५ वा वर्धापनदिन उत्साहात पार पडला !

पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘वंदनीय रमाबाई रानडे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पुणे सार्वजनिक सभा, पुणे’च्या १५५ व्या वर्धापनदिनानिमित्त २ एप्रिल या दिवशी रामेश्वर मार्केट, विजय मारुति चौक येथील सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
या प्रसंगी ‘मुक्तांगण इंग्लिश स्कूल’च्या शिक्षिका सौ. प्राजक्ता मुरमट्टी यांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. माधवी वैद्य या उपस्थित होत्या, तसेच ‘पुणे सार्वजनिक सभे’चे अध्यक्ष श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांच्यासह सार्वजनिक सभेचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने करण्यात आला. या वेळी सार्वजनिक सभेचे कार्याध्यक्ष श्री. अनिल शिदोरे यांनी सार्वजनिक सभेच्या स्थापनेपासून १५५ वर्षे चालू असलेल्या कार्याची विस्तृत ओळख करून दिली. ते म्हणाले की, समाजात विविध प्रकारे कार्य करणार्या आणि सामाजिक बांधिलकी जपणार्या नि:स्पृह कार्यकर्त्यांचा सन्मान संस्था करते. यातून त्या कार्याचा एकप्रकारे गौरवच होत असतो.
त्यानंतर ७० वर्षांहून अधिक वय असणार्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान करण्यात आला. सार्वजनिक सभेच्या वतीने ‘स्वा. सावरकर’ या विषयावर घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाला १०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सार्वजनिक सभेच्या वतीने आभार मानण्यात आले.
पुरस्कार सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी अर्पण ! – सद्गुरु स्वाती खाडये

हा पुरस्कार मी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते. पूर्वीच्या स्त्रिया धर्माचरण करत असत; मात्र सध्या महिला सबलीकरणाच्या नावाखाली पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण होतांना दिसत आहे, तसेच शाळांमधून धर्मशिक्षण आणि भारताचा खरा इतिहाससुद्धा शिकवला जात नाही.
धर्मशिक्षणाच्या अभावी स्त्रिया ‘लव्ह जिहाद’सारख्या आक्रमणांना फसत आहेत. धर्माचे ज्ञान न शिकवल्याने समाज दिशाहीन झाला आहे. महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन अबला नाही, तर सबला व्हायला हवे. महिला सबलीकरण करायचे असेल, तर धर्मशिक्षण घ्यायला हवे; कारण धर्मशिक्षणाने आत्मतेज जागृत होते. साधनेने आपल्यामध्ये दैवी शक्ती निर्माण होते. यासाठी सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार, धर्मजागृती, धर्मरक्षण, धर्मशिक्षण आणि हिंदूसंघटन या ५ सूत्रांनुसार कार्य चालू आहे.

शिक्षक हे पुष्कळ मोठे दायित्व आहे. विद्यार्थ्यांना घडवतांना त्यांची प्रकृती, त्यांचे गुण-कौशल्य याचा अभ्यास केला, तर त्यांच्याशी जुळवून घेता येऊ शकते. – सौ. प्राजक्ता मुरमट्टी

प्रत्येक पुरस्कार हा कार्याच्या पुढील दिशेसाठी प्रेरणा असतो. सध्याची सामाजिक स्थिती, स्त्रियांवर होणारे अत्याचार हे प्रश्न भयावह आहेत; पण तरुणांकडे या प्रश्नांना उत्तरे देण्याची शक्ती आहे. या तरुणांमध्ये विचारांची शक्ती आहे. तिचा योग्य वापर व्हायला हवा. – साहित्यिक सौ. माधवी वैद्य

सद्गुरु स्वाती खाड्ये २५ वर्षे अविरत धर्माचे कार्य करत आहेत ! – विद्याधरपंत नारगोलकर

आपली हिंदु संस्कृती ही भोगप्रधान नसून त्यागाची आहे. सुसंस्कारित पिढी निर्माण व्हायला हवी, यासाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाड्ये या २५ वर्षे अविरत धर्माचे कार्य करत आहेत, त्यांचा जीवनप्रवास खडतर आहे. ४३५ हून अधिक धर्मसभांमधून त्यांनी धर्माची बाजू प्रखरपणे मांडली आहे. लव्ह जिहाद आणि हलाल जिहाद यांविषयी त्या जनजागृती करत आहेत. त्याचेच फलित म्हणून अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (मंदिरात करून यायच्या वेशभूषेचे नियम) लागू झालेली आपल्याला दिसत आहे. अनेक युवती आज स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध होत आहेत.
