गोमांस विक्री करणार्‍यांना सावंतवाडीतून हद्दपार करा ! – सकल हिंदु समाजाची मागणी

सावंतवाडी – शहरात मागील ३५ वर्षांपासून गोमांस विक्री करणार्‍या आरोपीला वाचवण्यासाठी हिंदू बांधवांना चुकीच्या पद्धतीने गोवले जात असल्याचा आरोप सकल हिंदु समाजाने केला आहे. आरोपीच्या बहिणीकडून खोटी विनयभंगाची तक्रार प्रविष्ट करून हिंदु तरुणांना नाहक गुंतवण्याचा प्रयत्न झाल्यास आतापर्यंत शांत असलेला हिंदु समाज रस्त्यावर उतरेल, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली, तसेच आरोपीला तातडीने सावंतवाडीतून हद्दपार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

१ एप्रिल या दिवशी शहरातील पर्णकुटी विश्रामगृहात सकल हिंदु समाज बांधवांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेला सुनील पेडणेकर, अजित सांगेलकर, महेश पांचाळ, अधिवक्ता राजू कासकर, अमोल साटेलकर, बंटी जामदार, कृतिका कोरगावकर, श्रद्धा धारगळकर आदी उपस्थित होते.

बेळगाव येथून सावंतवाडी येथे गोमांसाची वाहतूक करणारी चारचाकी हिंदुत्वनिष्ठांनी पाठलाग करून माडखोल येथे ती रोखली. या वेळी चालक सर्फराज भाऊद्दीन ख्वाजा याला गोरक्षकांनी पोलिसांच्या कह्यात दिले होते. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

या वेळी सीताराम गावडे म्हणाले की, शहरात गोमांस विक्री करणारा आरोपी मांस कुठे विकतो आणि यामागे सूत्रधार कोण आहेत ? याचा शोध घेणे आवश्यक आहे. बेळगावच्या कत्तलखान्यातून हे मांस येत असल्याचे अन्वेषण साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले यांनी केले आहे; मात्र हे मांस शहरात कोणत्या उपाहारगृहांमध्ये पुरवले जात होते याचाही शोध घेतला गेला पाहिजे. गोमांस विक्रीचा प्रकार उघडकीस आणल्यामुळे हिंदु बांधवांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे कायदा अन् सुव्यवस्था बिघडली, तर त्याला प्रशासन उत्तरदायी असेल. गाय ही हिंदूंची माता असून तिची हत्या करून मांसाची वाहतूक आणि विक्री करणार्‍या प्रवृत्तीला वेळीच रोखले गेले पाहिजे. सावंतवाडी शहरात पोलीस तपासणी नाकी असतांनाही गोमांस येत असल्याची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही ? हे आश्चर्यकारक आहे. ही तपासणी नाकी काय कामाची ? केवळ केवळ हप्ते मिळवण्यासाठी ती आहेत का ? जे काम पोलिसांनी करायला हवे, ते आमच्या हिंदू बांधवांनी केले.’

माजी नगरसेवक यशवंत उपाख्य सुनील पेडणेकर म्हणाले, ‘‘सावंतवाडी शांत आणि सुसंस्कृत शहर आहे. येथे सर्व जाती-धर्मांचे लोक एकोप्याने नांदत असतांना ही विकृती पुढे येऊ देणार नाही. आरोपीला कोण वाचवत आहे ? परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याला प्रशासन उत्तरदायी असेल. दुकानावर धाड घातल्यावर तेथे कोंबडीचे मांस आढळले, याचा अर्थ त्याची माहिती आधीच मिळाली होती.’’

‘हिंदु तरुणांना नाहक खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवल्यास हिंदु महिला, भगिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहातील’, असे कृतिका कोरगावकर यांनी सांगितले, तसेच ‘येत्या ७ दिवसांत आरोपीला कठोर शिक्षा न झाल्यास रस्त्यावर उतरू’, अशी चेतावणीही दिली.