पुढील आठवड्यात होणार सुकाणू समितीची बैठक

पणजी, २ एप्रिल (वार्ता.) – येथे झालेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात ‘मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेपर्यंत गप्प बसणार नाही’, असा निर्धार सर्वांनी केला आहे. यामुळे समितीच्या पुढील कृतीवर आता सर्वांचे लक्ष लागून आहे. केवळ मराठीप्रेमींना हाक देऊन न थांबता समितीचे खरे कार्य आता चालू झाले आहे. पुढील आठवड्यात सुकाणू समितीची बैठक होणार आहे, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली पणजी येथे ३१ मार्च या दिवशी आयोजित केलेल्या मराठी राजभाषा निर्धार मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. या पार्श्वभूमीवर पुढील कार्याची दिशा स्पष्ट करतांना प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘पुढील आठवड्यात होणार्या सुकाणू समितीच्या बैठकीत तालुकास्तरीय समित्यांची स्थापना होणार आहे. या समित्यांची स्थापना ३ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तालुका समिती स्थापन झाल्यानंतर पंचायत पातळीवर प्रचार आणि जनजागृती मोहीम चालू केली जाणार आहे. राज्यातील १७० पंचायतींमध्ये मराठीचा प्रचार करण्यात येणार आहे. राज्यातील सासष्टी तालुका वगळता इतर सर्व भागांमध्ये मराठीविषयी जागरूकता वाढवली जाणार आहे. सासष्टी तालुक्यात मराठीप्रेमी अल्प असल्याने त्यांना जवळील बैठकांमध्ये बोलावले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात ५० ते १०० मराठीप्रेमींना एकत्र करून व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये कलाकार, नाट्यसंस्था, संगीतकार, कवी, लेखक, महिला, युवक आदींचा सक्रीय सहभाग असेल.’’