काळेपडळचे पोलीस अधिकारी टिपू पठाणला पाठीशी घालत असल्याचा त्रस्त नागरिकांचा आरोप !
हडपसर (जिल्हा पुणे) – कुख्यात गुंड टिपू पठाणचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे, त्यामध्ये तो टोळक्यासोबत नाचतांना आणि गर्दीवर पैसे उधळतांना दिसत आहे. हा प्रकार पुण्यातील सय्यदनगर भागात घडल्याचे समजते. पोलिसांनी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धकाला अनुमती कशी दिली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टिपू पठाणवर हत्येचा प्रयत्न, खंडणी, नागरिकांना त्रास देणे, भूमी बळकावणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. जानेवारी २०१९ मध्ये टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांना पुण्यातील बांधकाम व्यावसायिक नीलेश बिनावत यांच्या वाहनावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सय्यदनगर, हडपसर येथे टिपूची मोठी दहशत असून काळेपडळ पोलीस ठाण्याचे अधिकारी याला पाठीशी घालत असल्याने पुणे पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस तत्त्वनिष्ठ कधी होणार ? – संपादक)
कुख्यात गुंड टिपू पठाणचे अवैध कारनामे !
१. ससाणेनगर हडपसर येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर अनधिकृत ताबा घेऊन तिथे त्याने शेड उभारली आहे. त्याचे गुंड देखरेख करतात. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आल्यावर त्याच्या कार्यकर्त्यांनी अधिकार्यांना दमदाटी केली, भ्रमणभाष हिसकावून घेतला. (पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केली का ? – संपादक)
२. ईदच्या कार्यक्रमात त्याने गझलचे आयोजन केले होते. यामध्ये तडीपार गुंड सहभागी झाले होते, याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. हडपसर परिसरात त्याचे अवैध फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लागले होते. त्याकडे महापालिका प्रशासन आणि पोलीस यांनी डोळेझाक केली.
३. ‘काळेपडळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी हे गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत’, असा आरोप एका पीडित महिलेने केला आहे.
सय्यदनगर येथील गरीब कुटुंबाच्या १ गुंठा जागेवर टिपूच्या गुंडांनी ताबा घेतला आहे. पोलिसांत तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नाहीत, असे पीडित महिलेने सांगितले.
संपादकीय भूमिका :नागरिकांच्या या आरोपांकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देऊन संबंधित पोलीस अधिकार्यांवर कारवाई करणार का ? |