यंदापासून इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत समान प्रश्नपत्रिका आणि एकाच वेळी परीक्षा

राज्य प्रशिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ काढणार प्रश्नपत्रिका

पणजी, २ एप्रिल (वार्ता.) – ७ एप्रिलपासून चालू होणार्‍या नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वरूप कसे असेल, याविषयीची माहिती नुकतीच राज्य प्रशिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ आणि शिक्षण खाते यांनी दिली.

राज्य प्रशिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाच्या संचालिका मेघना शेटगावकर म्हणाल्या, ‘‘मूल्यांकनात दर्जात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिका राज्य प्रशिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ काढणार आहे. इयत्ता ९ वी आणि १० वी साठीच्या अंतिम परीक्षेची प्रश्नपत्रिका प्रतिवर्षीप्रमाणे गोवा शालांत मंडळ काढणार आहे. त्या व्यवस्थेमध्ये काही पालट असणार नाही.’’ शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे म्हणाले, ‘‘७ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू होईल आणि २९ एप्रिलपर्यंत इयत्ता ९ वीपर्यंतचा निकाल घोषित केला जाणार आहे.’’