दाबोळी विमानतळाला सर्वोत्तम विमानतळ म्हणून मान्यता

गोव्याच्या पायाभूत सुविधा विकासाला जागतिक स्तरावर मान्यता

पणजी, २ एप्रिल – गोव्याच्या विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठतांना दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रतिष्ठित ‘एसीआय-एएस्क्यू सर्वेक्षण २०२४’मध्ये ‘एएस्क्यू’ मानांकनाच्या आधारे भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत सर्वोत्तम विमानतळ म्हणून स्थान देण्यात आले आहे. ही मान्यता अभ्यागतांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि अखंड प्रवास अनुभव प्रदान करण्याच्या गोव्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ३० व्या वार्षिक दिनी केलेल्या या घोषणेने दाबोळी विमानतळाची अपवादात्मक सेवा गुणवत्ता आणि प्रवासी अनुभव यांवर प्रकाश टाकला. यामुळे दाबोळी विमानतळाला चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या पुढचे स्थान मिळाले.

जोडणी आणि पायाभूत सुविधांमधील लक्षणीय सुधारणा यांमुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाने जोरदार प्रगती केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवाशांना उत्तम अनुभव मिळावा, यासाठी राज्य वाहतूक सुविधांचा विस्तार करत आहे आणि शाश्वत पर्यटन उपक्रम विकसित करत आहे. पर्यटन-संबंधित सुविधांचा चालू असलेला विस्तार हा गोव्याला येथील सांस्कृतिक आणि पर्यावरणीय अखंडता जपून ठेवतांना एक प्रमुख पर्यटनस्थळ बनवण्याच्या सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत करतो.