(कोमुनिदाद ही गावकर्यांची पोर्तुगीजकालीन संस्था)

पणजी, २ एप्रिल (वार्ता.) – कोमुनिदादचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी पूर्णवेळ प्रशासकासह अन्य कर्मचार्यांचीही लवकरच भरती होणार आहे, तसेच कोमुनिदादचे संगणकीकरण करण्याची प्रक्रियाही लवकरच चालू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कोमुनिदादच्या विविध समस्या मांडण्यासाठी कोमुनिदाद समितीचे अध्यक्ष अणि इतर सदस्य यांनी २ एप्रिल या दिवशी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी अपुरा कर्मचारी वर्ग, साधनसुविधांचा अभाव आदी कोमुनिदादशी निगडित विविध समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या.
या बैठकीनंतर पत्रकारांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कोमुनिदादच्या प्रशासकाकडे इतर खात्याचेही दायित्व असते; मात्र कोमुनिदादसाठी पूर्णवेळ प्रशासकाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन कागदपत्रे आणि कामकाज पहाण्यासाठी कर्मचार्यांचीही आवश्यकता असते. कोमुनिदादचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी संगणकीकरण होण्याचीही आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने कोमुनिदादला संगणक, प्रिंटर आणि इतर आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संगणक हाताळणार्या कर्मचार्याची (कॉम्प्युटर ऑपरेटरची) नेमणूक करण्यात येणार आहे. ’’