Waqf Bill Debate : मतपेढीसाठी अल्पसंख्यांकांना घाबरवले जात आहे ! – अमित शहा

वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत रात्री उशियापर्यंत चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – केंद्र सरकारने २ एप्रिल या दिवशी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. दुपारी १२ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या सदस्यांनी त्यांची मते मांडली. चर्चेच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, वक्फमध्ये इस्लामेतर गोष्टींना अनुमती दिली जाणार नाही. मतपेढीसाठी अल्पसंख्यांकांना घाबरवले जात आहे.

लोकसभेत विधेयक संमत झाल्याखेरीज ते राज्यसभेत मांडले जाणार नाही. नियोजनानुसार उद्या, ३ एप्रिल या दिवशी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार होते. त्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा झाल्यानंतर त्यावर मतदान होणार आहे.

तत्पूर्वी सकाळी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेने रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर विचार मांडले. काँग्रेसकडून गौरव गोगई, समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसकडून कल्याण बॅनर्जी, शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून अरविंद सावंत आदींनी विरोधात मत मांडत विधेयकाला विरोध केला, तर भाजपकडून माजी कायदामंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, जनता दल (संयुक्त)कडून लल्लन सिंह, शिवसेना (शिंदे) पक्षाचे श्रीकांत शिंदे आदींनी समर्थानार्थ मते मांडली.

वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे ! – किरेन रिजिजू

किरेन रिजिजू

सकाळी केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडल्यावर म्हटले की, वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे. आता वक्फमध्ये शिया, सुन्नी, बोहरा, मागासवर्गीय मुसलमान वर्ग, मुसलमानेतर तज्ञ आणि महिला हेही असतील. वक्फ बोर्डात ४ मुसलमानेतर सदस्य असू शकतात आणि त्यांपैकी २ महिला असणे आवश्यक आहे. आम्ही हे विधेयक आणले नसते, तर संसदेवरही वक्फने दावा सांगितला असता.

वक्फ विधेयकाद्वारे सरकार कोणत्याही धर्माच्या संदर्भात हस्तक्षेप करणार नाही. हे विधेयक केवळ मालमत्तेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे आणि मंदिर, मशीद किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर कुणी हा मूलभूत फरक समजू शकला नाही किंवा जाणूनबुजून समजून घेऊ इच्छित नसेल, तर माझ्याकडे त्यावर कोणताही उपाय नाही.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या घराणेशाहीवर केली टीका !

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि अखिलेश यादव

भूमिका मांडतांना अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका करतांना म्हटले की, ‘भाजप जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचे सांगतो, तरीही त्यांना स्वतःचा राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप निवडता येत नाही.’

यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर देतांना म्हटले की, आमच्या पक्षाचे १२- १३ कोटी सदस्य असल्यामुळे सर्वांचा विचार घेऊन निर्णय घ्यावा लागतो. काही पक्षात एकाच कुटुंबातील ५ सदस्य बसून निर्णय घेतात. तर तुमच्या पक्षात तुम्हीच निर्णय घेता. तुम्ही पुढचे २५ वर्षर्े अध्यक्ष असाल, असे मी आताच सांगतो.