अडचणी न सोडवल्यास रास्त भाव धान्य दुकानदारांची तीव्र आंदोलनाची चेतावणी !

सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – रास्त भाव धान्य दुकानदारांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य न्याय मिळावा. अन्यथा राज्य संघटनेच्या सूचनेनुसार १ मेपासून तीव्र आंदोलन करणार येईल, अशी चेतावणी ‘अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटने’च्या वतीने अन्न पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

निवेदनामध्ये म्हटले आहे की,

वर्ष २०१८ पासून दुकानदारांच्या धान्य वाटपाच्या दलालीमध्ये वाढ झालेली नाही. सध्याची महागाई पहाता धान्य वाटपाचे कमिशन प्रति १ क्विंटल मागे ३५० रुपये इतके मिळावे. वारंवार सर्व्हरच्या अडचणींमुळे पॉज मशीन बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक वेळा दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये वादाचे आणि हाणामारीचे प्रसंग उद्भवतात. यामुळे सर्व्हरची अडचण सोडवण्यात यावी. शासनाकडून दुकानदारांना येणार्‍या धान्यामध्ये अर्धा ते १ किलो धान्य अल्प येते. ही तूट दुकानदाराने कुठे दाखवायची ? काही ग्राहक वैयक्तिक कारणामुळे एखाद्या दुकानदाराविरुद्ध निनावी तक्रार करतात. त्या तक्रार अर्जानुसार कार्यालयीन अधिकारी दुकानाची पडताळणी करतात. तक्रारदाराने नावासह तक्रार केली असल्यास दुकानाची पडताळणी करण्यास आमची काहीही हरकत नाही; परंतु निनावी केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात येऊ नये. आतापर्यंत ७५ टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थी व्यक्तींचे ई-केवायसीचे काम पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत वाढ मिळावी.