कोरोनाचे नियम पाळले न गेल्याने भारतात परिस्थिती बिघडली ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतियांना आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शिस्त शिकवली आणि लावली नसल्यामुळेच देशात ही स्थिती निर्माण झाली आहे !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – भारतात आलेल्या कोरोना सुनामीसाठी केवळ कोरोनाचे ‘म्युटेशन’ उत्तरदायी आहे, असे नाही. पहिली लाट ओसरताच निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मोठमोठ्या प्रचारसभा आयोजित करणे, प्रचंड गर्दीचे सोहळे, कोरोनाचे अनेक व्हेरिएंट आणि मंदगतीने होणारे लसीकरण यांमुळे भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली. कोरोनाचे नियम पाळले नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसर्‍या लाटेमुळे भारतातील आरोग्यव्यवस्था पूर्णत: कोलमडण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेने भारतावर टीका केली आहे.

१. संघटनेचे प्रवक्ते तारिक जसारेव्हिव यांनी म्हटले की, कोरोना रुग्णांपैकी केवळ १५ टक्के लोकांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता भासते. त्यामध्येही अत्यंत अल्प रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते; मात्र योग्य माहिती मिळत नसल्याने भारतात लोक त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात भरती करण्याची घाई करत आहेत. ८५ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात. लोकांना घरगुती उपचाराविषयी माहिती देणे आवश्यक आहे.

२. संघटनेचे अध्यक्ष घेब्रयासिस म्हणाले की, भारताला ४ सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा (कोणत्याही गॅसमधील ऑक्सिजन वेगळे करून त्याचा साठा करणार्‍या उपकरणाचा) पुरवठा केला जाणार असून २ सहस्र तज्ञांचा ताफाही भारतात पाठवला जाणार आहे.

भारताचा बचाव करण्यात जग अपयशी ! – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांची टीका

कोरोनाच्या महामारीपासून भारताचा बचाव करण्यात जगातील सर्वच देश पूर्णत: अपयशी ठरले आहेत, अशा शब्दांत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी अप्रसन्नता व्यक्त केली.

डॉ. अँथनी फाउची यांनी पुढे म्हटले की, गरजू देशांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात धनाढ्य देश अपयशी ठरले आहेत. भारतातील सध्याची स्थिती जगातील हीच विषमता दर्शवत आहे. जागतिक महामारीचा लढा हा वैश्‍विक एकजुटीनेच लढला जाऊ शकतो. कोव्हॅक्स अभियानांतर्गत जागतिक आरोग्य संघटना भारताला तातडीने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे. धनाढ्य देशांनी हे दायित्व उचलले पाहिजे.