यथार्थ शिक्षणाचा मार्ग हिंदु संस्कृतीतच !

कोरोनाच्या काळात अनेक वार्षिक परीक्षा ‘ऑनलाईन’ घेण्यात आल्या. या ‘ऑनलाईन’ परीक्षेत उत्तरे शोधण्यासाठी संकेतस्थळांचे साहाय्य घेणे, एकत्रित येऊन प्रश्नपत्रिका सोडवणे, एकाला मिळालेली उत्तरे अनेकांना पाठवणे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी धडधडीतपणे कॉपी केल्याचा प्रकार अनेक ठिकाणी घडला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस पहाण्यासाठी परीक्षा असते; मात्र आज परीक्षेची व्याख्याच पालटून गेली आहे. परीक्षा कशा घ्याव्यात ? शिक्षण कसे द्यावे ? या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही ठोस योजना अद्याप उपलब्ध झाली नाही. अशाने पुढची पिढी राष्ट्राला पुढे नेण्याइतपत शिक्षित होईल का ? मेकॉलेची शिक्षणपद्धत निरर्थक असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे यथार्थ शिक्षणाचा मार्ग भारतीय गुरुकुल परंपरेतच आहे; परंतु प्रशासन या पर्यायाकडे वळतच नाही, ही शोकांतिका आहे.

कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर महाराज

समाजात आजही काही उदाहरणे आहेत, जिथे अशा पद्धतीचे शिक्षण मुले घेत आहेत. कोल्हापूर येथील कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर महाराज यांचे यासंदर्भात एक सुंदर उदाहरण दृष्टीस पडते. वर्ष १८३७ पूर्वी ७ लाखांहून अधिक अशा प्रकारच्या शाळा होऊन गेल्या. कणेरी मठ येथील गुरुकुलात विद्यार्थी नोकरदार नव्हे, तर उद्योजक होतील अशा पद्धतीचे शिक्षण देण्याचा नूतन उपक्रम चालू आहे. १४ विद्या आणि ६४ कला शिकता येतील, असे शिक्षण येथे दिले जात असून, विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण कसे व्हावे ? याचे प्रशिक्षण येथे दिले जात आहे. तसेच या गुरुकुलात विद्या शिकवण्याचे पैसे घेतले जात नाहीत. या शिक्षणपद्धतीचे पुष्कळ कौतुक होत असून विद्यार्थ्यांनी असेच घडायला हवे, अशी इच्छा पालकांमध्ये निर्माण होत आहे. एकीकडे भरमसाठ पैसे घेऊनही सक्षम शिक्षणप्रणाली न उभारू शकणाऱ्या शाळा, महाविद्यालये आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन नव्हे, तर विद्यार्थ्यांना पैसे देऊन आदर्श व्यक्ती घडवणारी गुरुकुल परंपरा आहे. कोरोनामुळे हे चित्र अतिशय स्पष्ट झाले असून यातून भारतीय संस्कृतीचे आणि गुरुकुल परंपरेचे महत्त्व पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. आताच्या विद्यापिठांनी यातून धडा घेऊन अशा शिक्षणपद्धतीला प्रोत्साहन देता येईल का ? याचा विचार आणि त्या दृष्टीने कृती करणे आवश्यक आहे, तरच पुढची पिढी राष्ट्र समर्थपणे सांभाळण्यासाठी घडेल !

– श्री. केतन पाटील, पुणे.