जगात २० वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये कोरोना तिसर्‍या क्रमांकावर !

१६ मासांत जगात ३० लाख लोकांचा मृत्यू !

नवी देहली – जगातील २१९ देशांत कोरोनाचा संसर्ग असून गेल्या १६ मासांत ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ दशकांत नैसर्गिक आपत्तींत जेवढे एकूण बळी गेले, त्यापेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे समोर आले आहे. या अहवालानुसार गेल्या २ दशकांत भारतात एकूण ३२० विघातक नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली. त्यांत ७९ सहस्र ७३२ लोकांचे बळी गेले.

१. संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती निवारण कार्यालयाच्या अहवालानुसार जगात वर्ष २००० ते २०१९ या काळात १० सर्वाधिक विध्वंसक नैसर्गिक आपत्तींत ९ लाख ४० सहस्र लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोनाने गेल्या १६ मासांमध्ये १५ एप्रिलपर्यंत जगात ३० लाख ३ सहस्र लोकांचा मृत्यू झाला.

२. सर्वाधिक रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत आजारांच्या सूचीमध्ये कोरोना तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. एड्समुळे वर्ष २०१७ ते २०१९ या ३ वर्षांत २० लाख ४० सहस्र, तर क्षयरोगामुळे गेल्या २ वर्षांत २९ लाख लोक मृत्यूमुखी पडले.