मुंबई – ‘रेमडेसिविर’ औषधाचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘ब्रुक फार्मा’चे अधिकारी राजेश डोकानिया यांना कह्यात घेतल्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप यांचा कलगीतुरा रंगला आहे. या कारवाईवरून १७ एप्रिलच्या मध्यरात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बीकेसी येथील पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिसांशी वाद घातला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजेश डोकानिया यांना विलेपार्ले येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हेही तेथे आले. या ठिकाणी पोलिसांसमवेत त्यांचा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सर्वजण पोलीस उपायुक्तालयात गेले. प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी या आस्थापनाला भेट दिली होती. त्या वेळी भाजपला ‘रेमडेसिविर’ची ५० सहस्र इंजेक्शन पुरवण्याचे आश्वासन ‘ब्रुक फार्मा’कडून देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ब्रुक फार्मा’ आस्थापनाच्या संचालकांकडे ६० सहस्र ‘रेमडेसिविर’चा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना अन्वेषणासाठी कह्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे असल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.
मंत्र्यांच्या खासगी सचिवाने धमकी दिल्यावर कारवाई झाली ! – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राला ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन मिळावे, या प्रामाणिक हेतूने आम्ही प्रयत्न करत असतांना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकार्याला कह्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे. एका मंत्र्यांच्या खासगी सचिवाने दूरभाषवरून धमकी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन आणि दमण येथील आवश्यक त्या अनुमती घेतल्या असतांना, तसेच ‘अधिकाधिक ‘रेमडेसिविर’ महाराष्ट्राला द्या’, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या आस्थापनाला सांगितले असतांना इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी व्यक्त केली.
‘रेमडिसिविर’चा साठा स्वत:कडे घेण्याचा भाजपचा प्रयत्न ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री
निर्यातीवर बंदी घातल्यानंतरही काही आस्थापने रेमडेसिविर विकण्याची अनुमती मागत आहेत. ‘ब्रुक फार्मा’चे संचालक राजेश डोकानिया त्यांच्याकडे ‘रेमडेसिविर’चा साठा असल्याचे सांगून त्यांनी हे औषध शासनाला देण्याची सिद्धता दर्शवली होती. ‘हा साठा शासनाला देऊ नये, तो स्वत:कडे घ्यावा’, अशी भाजपची भूमिका आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते पोलीस ठाण्यात का जातात ? पोलीस यंत्रणा जनतेसाठी काम करत आहे. आवश्यकता वाटल्यास डोकानिया यांना अन्वेषणासाठी बोलावण्यात येईल.