हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये सोमवती अमावास्येला दुसरे पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले !

  • साधूसंतांसह लाखो भाविकांनी मंगलमय स्नान केले !

  • सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत फलकांद्वारे साधूसंतांसह भाविकांचे स्वागत !

गंगा नदीमध्ये स्नान करतांना साधू

हरिद्वार, १२ एप्रिल (वार्ता.) – कुंभमेळ्यामधील मानाच्या विविध आखाड्यांचे साधूसंत यांच्यासह लाखो भाविकांनी गंगेमध्ये सोमवती अमावास्येच्या दिवशीचे दुसरे पवित्र स्नान केले. या प्रसंगी ‘हरकी पौडी’ येथे विविध आखाड्यांचे आचार्य, महामंडलेश्‍वर यांसह साधू-संत आणि लाखो भाविक यांनी गंगास्नान केले. ११ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत २१ लाखांहून अधिक भाविकांनी गंगास्नाचा लाभ घेतला, अशी माहिती कुंभमेळ्यासाठी नियुक्त असलेले पोलीस महासंचालक संजय गुंज्याल यांनी दिली. नेपाळचे शेवटचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शहा यांनीही पवित्र स्नान केले.
पवित्र स्नानासाठी प्रथम जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर गौतम गिरि महाराज यांनी शेकडो अनुयांसह गंगास्नान केले. त्यानंतर निरंजनी आखाड्यासह अग्नि आणि आवाहन, महानिर्वाणी, अनी, निर्मोही, दिगंबर, श्री पंचायती आखाडा बडा उदासीन, श्री पंचायती आखाडा नया उदासीन, श्री निर्मल आखाडा या आखाड्यांचे साधुसंत यांची त्यांच्या स्थळापासून स्नान घाटापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. या सर्व आखाड्यांचे साधूसंत यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पवित्र स्नान केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून साधूसंतांचे स्वागत


कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने महामार्गावरील बैरागी आखाड्याचा चौक, तसेच हरकी पौडी येथे साधूसंत यांच्या  स्वागतासाठी फलक लावण्यात आले होते. संपूर्ण कुंभमेळ्यामध्ये हे फलक लक्ष वेधून घेत होते. विशेष म्हणजे हरकी पौडी क्षेत्रातही स्वागताचे फलक हाती धरण्यात आले होते. बैरागी आखाड्याच्या चौकामध्ये स्वागताच्या फलकामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते आणि सर्वांना उत्साह जाणवत होता. साधूसंतांच्या स्वागतासाठी हिंदु जनजागृति समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, समितीचे सर्वश्री. आनंद जाखोटिया, राजेश उमराणी, हरिकृष्ण शर्मा याच्यासह समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

१. महामार्गावरील बैरागी आखाड्याच्या चौकामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागतकक्ष लावण्यात आला होता. आखाड्यांची मिरवणूक स्वागतकक्षाजवळ येतातच साधकांकडून साधूसंत, महामंडलेश्‍वर आदी विविध संतांच्या नावाची मेगाफोनद्वारे उद्घोषणा करून त्यांचे स्वागत केले जात होते.

२. मेगाफोनद्वारे प्रभु श्रीराम, हनुमान आणि हिंदु राष्ट्र यांविषयीच्या उद्घोषणा केल्या जात होत्या. या घोषणांना साधूसंत आणि भक्तगण यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

गंगा नदीमध्ये स्नान करतांना साधू

वैशिष्ट्यपूर्ण :

१. मिरवणूक पहात असलेल्या काही भाविकांनी उत्स्फूर्तपणे संस्थेचा स्वागत फलक धरण्याची सेवा केली.

२. साधक आणि समिती कार्यकर्ते यांचा सेवाभाव पाहून एका भाविकाने त्यांना चहा पाण्याच्या बाटल्या स्वतःहून आणून दिला.

क्षणचित्रे

१. ऋषिकुल गंगा घाट, कश्यप घाट, गोविंदपुरी, प्रेमनगर आश्रम घाट, अलकनंदा घाट, बिरला घाट या ठिकाणी भाविकांनी स्नान केले.

२. प्रशासनाच्या वतीने बॉम्बशोधक पथक, अर्ध सैनिक दल, सीमा सुरक्षा दल यांसह स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.