भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी ! – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांना माहिती देतांना उजवीकडे श्री. अभय वर्तक

हरिद्वार, ९ एप्रिल (वार्ता.) – प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे कार्य लवकरात लवकर करावे. ज्याप्रमाणे जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित करण्यात आले, त्याचप्रमाणे भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले पाहिजे आणि ते होणे अत्यंत आवश्यक आहे. तिच आमची मागणी आहे, असे प्रतिपादन अखनूर (जम्मू-काश्मीर) येथील महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी केले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हरिद्वार येथे उभारण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली, तेव्हा ते बोलत होते. सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती दिली. हिंदु जनजागृति समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांचा पुष्पहार घालून सन्मान केला.

महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी प्रदर्शन केंद्राविषयी काढलेले कौतुकोद्गार !

संस्थेचे हे प्रदर्शन चांगली माहिती देणारे असून ते पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. हे प्रदर्शन पाहून मी प्रभावित झालो आहे. प्रदर्शनाची व्यवस्था उत्तम केली आहे. लहान मुलांसाठीची उत्तम माहिती प्रदर्शनामध्ये देण्यात आली आहे. त्यांना हिंदु धर्माविषयी अभिमान वाटेल. भविष्यात त्यांचे आत्मबळ वाढेल, असे कौतुकोद्गार महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी काढले.