यांना लगाम आवश्यकच !

नवी देहली येथे आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद केला पाहिजे, त्यांची जीभ कापली पाहिजे; मात्र भारतातील कायदे याची आम्हाला अनुमती देत नाहीत’, असे चिथावणीखोर वक्तव्य ट्विट करून केले. उत्तरप्रदेश येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून अमानतुल्ला यांनी हे वक्तव्य केले आहे. अमानतुल्ला खान यांचे वक्तव्य हे अत्यंत गंभीर आहे. महंतपदावरील हिंदूंच्या एका धर्मगुरूंचा शिरच्छेद करण्याची मागणी समाज माध्यमातून करणे यातून हिंदूंना एक संदेश देण्याचाच प्रयत्न केला आहे. ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्यानुसार यातून थेट फाळणीचीच धमकी देण्यात आली आहे, जी हिंदूंनी गांभीर्याने घेतली पाहिजे. खान यांचे विधान हे धर्मांधांना चिथावणी देणारे आहे. उद्या कुणाही धर्मांधाने कायदा हातात घेऊन गुन्हा केल्यास त्याचे दायित्व कुणाचे ? हिंदूंचे नेतृत्व करणारे संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा संपवण्याचा धर्मांधांचा कुटील डाव आहे. हे ओळखून हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक.

हिंदूंविरुद्ध चिथावणी !

साधारणपणे २-३ वर्षांपूर्वी कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याचा कांगावा धर्मांधांनी केला होता. एकाच तेही स्थानिक वृत्तपत्रात याविषयी वृत्त प्रसिद्ध झाले होते. तिवारी यांनी ‘तसे वक्तव्य केले नाही’, असेही सांगितले होते; मात्र केवळ मनात द्वेष बाळगून तिवारी यांची हत्या करण्यात आली. याविषयी धर्मांधांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर ओवैसींचा एका कार्यक्रमात नाच करतांना व्हिडिओ प्रसारित झाला होता. म्हणजे ‘ही हत्या करण्यामागे ओवैसी यांचीच चिथावणी कारणीभूत होती आणि तिवारी यांच्या हत्येनंतर ओवैसी यांना आनंद झाला, असे समजण्यास वाव आहे. ओवैसींसारखे धर्मांधांचे नेते सूचक विधाने करतात. स्वत:च्या धर्मबांधवांना योग्य तो संदेश त्यातून जाईल अशी व्यवस्था करतात. त्यानंतर गुन्हा घडल्यानंतर मात्र स्वत: नामानिराळे रहातात. या ओवैसी यांचे बंधु अकबरूद्दीन यांनी काही वर्षांपूर्वी ‘पोलिसांना हटवल्यास १५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना भारी पडतील’, असे विधान केले होते. या विधानातून ओवैसी यांनी मुसलमानांना सिद्धताच करून ठेवण्यास सांगितले आहे. या विधानाकडे हिंदुत्वनिष्ठांचा अपवाद वगळता कुणीही गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे भविष्यात हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

‘आप’चे पाप !

अमानतुल्ला खान यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे, असे थेट नसले, तरी वर्ष २०१९ मध्ये त्यांच्यावर देहली येथील एका दंगलीच्या संदर्भात गुन्हा नोंद आहे. नागरिकता सुधारणा विधेयकाविषयी अपप्रचार करून त्यांनी दंगल होईल असे वातावरण निर्माण केले होते. त्याचप्रमाणे गुप्तचर खात्यातील पोलीस अंकीत शर्मा यांच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी आणि दंगलीत मोठा हात असणारा आपचा नगरसेवक ताहीर हुसेन याची त्यांनी पाठराखण केली होती. या दोन्ही घटनांमध्ये साम्य म्हणजे नगरसेवक आणि आमदार आप या पक्षाचाच आहे. आपमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले दंगलीसारख्या गुन्ह्यातील आरोपी असतील, तर तो पक्ष एखाद्या प्रदेशात कायदा-सुव्यवस्था राखू शकेल का ? हत्या करण्यासारखी चिथावणीखोर वक्तव्ये करणारे लोक असणार्‍या आपची पक्ष म्हणून असलेली मान्यताच का रहित करू नये ?, असा प्रश्‍न जनतेला पडतो.

महंतांचे धर्मकार्य !

महंत यति नरसिंहानंद म्हणजे पूर्वाश्रमीचे दीपक त्यागी हे विदेशातून उच्च विद्याविभूषित होऊन भारतात आलेले व्यक्तिमत्त्व आहे. तरुण वयात अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेऊन भारतात नोकरीसाठी आल्यावर एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एक हिंदु मुलगी लव्ह जिहादमध्ये फसली आणि त्यामध्ये तिचा पुष्कळ छळ करण्यात आला. या मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून अनेक मुसलमान मुलांशी संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. ती केवळ एकच मुलगी नव्हती. तिच्यासारख्या अशा ५० हून अधिक मुलींविषयी हे घडलेे. ही सर्व माहिती त्या मुलीने जेव्हा दीपक त्यागी यांना सांगितली आणि त्यापूर्वी ते कार्यरत असलेल्या एका पक्षातील व्यक्तीने धर्मांधांविषयी सद्य:स्थिती त्यांना सांगितली, तेव्हा त्यांनी हिंदूंसाठी काहीतरी करण्याचा निश्‍चय केला आणि त्यांचे रूपांतर महंत यति नरसिंहानंद यांच्यात झाले. डासनासारख्या मुसलमानबहुल क्षेत्रातही महंतांचे कार्य प्रभावी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी डासना मंदिरावर हिंदूंव्यतिरिक्त इतरांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई असल्याचा फलक लावला. त्यांच्या या फलकाची सामाजिक माध्यमांवर चर्चा झाली आणि अनेकांनी त्याप्रमाणे फलक सिद्ध करून ते मंदिरांवर लावले. त्यापूर्वी डासना मंदिरात अवैधपणे घुसणार्‍या एका धर्मांध मुलाला बदडण्यात आले. महंतांच्या सांगण्यानुसार तो धर्मांध युवक शिवपिंडीवर लघुशंका करण्यासाठी आणि मंदिर अपवित्र करण्यासाठी आला होता.

महंत नरसिहानंद यांनी धर्मांधांविरुद्ध आतापर्यंत कणखर भूमिका घेतली आहे. दंगलींचे मूळ धर्मांधांना मिळणारी शिकवण कशी कारणीभूत आहे, हे ते सातत्याने सांगत असतात. त्यांनी हिंदूसंघटनाचे कार्यही प्रभावीपणे केले आहे. त्यामुळे धर्मांध त्यांना वचकून असतात. यामुळे त्यांच्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य करून त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी खान यांनी वक्तव्य केले आहे. ओवैसी यांचाही महंतांना का विरोध आहे, हे लक्षात येते. आप आणि एम्.आय.एम्. यांचे लोकप्रतिनिधी महंतांविरुद्ध देहलीत एकत्र येतात, तर हिंदूंनी त्यांच्या रक्षणार्थ संघटित होणे आवश्यक. हिंदूंच्या धर्मगुरूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा जाहीर कट जर देहलीत शिजत असेल, तर सरकारनेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन गुन्हा होण्याच्या आत संबंधितांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे. तरच शासनव्यवस्था अस्तित्वात आहे, असे म्हणू शकतो अन्यथा अराजक दूर नाही !