दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठा पाऊस पडल्यावर साटेली, भेडशी येथील नदीला मोठा पूर येतो, तेव्हा कालव्यांचे दरवाजे उघडले जातात आणि पाण्याचा लोंढा येऊन पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथील नदीपात्रातील गाळ न काढल्यास नदीच्या पात्रातच उपोषणाला बसणार, अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णु मुंज यांनी प्रशासनाला दिली आहे.
नदीतील गाळ काढण्याविषयी निवेदन देऊन २ मास होत आले. त्या वेळी ‘पावसाळा चालू होण्यापूर्वी काम करू’, असे आश्वासन दिले होते; परंतु तसे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. सद्य:स्थितीत तिलारी धरण कालवा विभागाकडे विचारणा केल्यास त्यांनी यांत्रिकी विभागाकडे बोट दाखवले आहे. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता केवळ आश्वासने दिली जात आहेत. याविषयी प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नसून टोलवाटोलवी केली जात आहे. पावसाळा चालू होण्यास काही कालावधीच राहिला आहे, तरी शासनाच्या अधिकार्यांनी दायित्वाची जाणीव ठेवून त्वरित काम हाती घ्यावे अन्यथा नदी पात्रातच उपोषणाला बसणार असल्याची चेतावणी मुंज यांनी दिली आहे.