कठोर निर्बंधांची मानसिक सिद्धता ठेवण्याविषयीचे सूचक विधान
मुंबई – दळणवळण बंदीच्या संदर्भात अजून तरी कोणताही निर्णय झालेला नाही. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधी राज्यशासन पावले उचलणारच आहे. त्यादृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी, हाच दृष्टीकोन आहे. गर्दी होणार्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत. अंतिम झाल्यानंतर त्याविषयी कळवण्यात येईल. कठोर निर्बंधांची मानसिक सिद्धता ठेवा. नियम पाळा आणि दळणवळण बंदी टाळा, अशा शब्दांत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला चेतावणी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. लसीकरण वेगाने चालू असून ‘हर्ड इम्युनिटी’ आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातून रुग्णसंख्या न्यून होतांना दिसेल.
२. बेड उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती मुंबईत किंवा जिल्ह्यांमध्ये कुठेही नाही. काही ठराविक रुग्णालयात जिथे पुष्कळ मागणी असते, तिथे अडचणी निर्माण होत आहेत. सध्या मुंबईत अतीदक्षता विभागाचे ४०० बेड, ऑक्सिजनचे २ सहस्र १६० बेड आणि व्हेंटिलेटरचे २१३ बेड उपलब्ध आहेत. बेड वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
३. कोरोनाची रुग्णसंख्या अशीच रहाणार असेल आणि लोक गांभीर्याने वागणार नसतील, तर निर्बंध अधिक कडक करणे यासंदर्भातील निर्णय घ्यावाच लागेल.
शरद पवार यांची प्रकृती चांगली !
पित्ताशयात खडे झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रकर्म करून पित्ताशयाचा खडा काढला आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. आणखी एका शस्त्रकर्माची त्यांना आवश्यकता आहे. त्याविषयी आधुनिक वैद्य ठरवतील, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.