रेप कल्चर !

ब्रिटनमधील काही सरकारी आणि खासगी शाळा अन् महाविद्यालये येथे चालू असलेले ‘रेप कल्चर’ उघड झाल्यामुळे देशात खळबळ उडाली आहे. ‘रेप कल्चर’मध्ये मुली किंवा महिला यांच्यावर इतक्या प्रमाणात लैंगिक अत्याचार होतात की, काही काळाने असे अत्याचार होणे, हे त्यांना ‘सामान्य’ वाटू लागते. आतापर्यंत ब्रिटनमधील विविध शाळांमधून ५ सहस्र ८०० तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत आणि ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या तक्रारींमध्ये शाळा-महाविद्यांलयातील मुलांनी मुलींचे लैंगिक शोषण करणे, नको त्या ठिकाणी स्पर्श करणे, सामाजिक माध्यमांतून त्यांची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे प्रसारित करणे, अश्‍लील संदेश पाठवणे, धमकावणे आदी प्रकारांचा समावेश आहे. याविषयी अनेक भयावह अनुभव मुलींनी कथन केले आहेत. काही मुलींनी तर ‘शाळा आणि महाविद्यालये लैंगिक शिकार्‍यांचे अड्डे बनले आहेत’, असे म्हटले आहे. यात कळीचे सूत्र म्हणजे अशा घटना मुलींच्या आई-वडिलांना कळल्यावर आणि त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास मुलीच त्यांना रोखतात. त्यांचे म्हणणे असते, ‘माझ्यावर एवढेच अत्याचार झाले आहेत; मात्र माझ्या ओळखीच्या अनेक मुलींना यापेक्षा अधिक यातना भोगाव्या लागल्या आहेत.’ स्वतःचे शीलभंग होत असतांना त्याचे काहीही न वाटणे ही मानसिकता अधिक भयावह आहे. ब्रिटनमधील ज्या शाळांमध्ये हे ‘रेप कल्चर’ उघड झाले आहे, त्यात डूलविच महाविद्यालय, लेटमायर स्कूल, वेस्टमिनिस्टर स्कूल, हायगेट स्कूल आदी शाळा-महाविद्यालयांचा समावेश आहे. यांतील काही शाळा आणि महाविद्यालये ही उच्चभ्रू समजली जातात. सामान्य शाळांमध्ये सोडाच अशा ‘श्रीमंत’ शाळांमध्ये जेथे दर्जात्मक शिक्षण (?) दिले जाते, तेथे वासनांध निपजल्यामुळे समाजधुरिणी, शिक्षणतज्ञ आणि राजकारणी आदी सर्वांचेच धाबे दणाणले आहे. त्याहून पुढे जाऊन डूलविच महाविद्यालयाने या अत्याचारांच्या विरोधात आयोजित आंदोलनात सहभागी होण्यास मुलींना मज्जाव केला आहे. त्यामुळे ‘ही शाळा-महाविद्यालये पीडित मुलींना खरोखर न्याय देऊ शकतील का ?’ हा प्रश्‍न आहे.

ब्रिटनमधील या घटनांविषयी भारताने नोंद घेण्यामागेही विशेष कारणे आहेत. ब्रिटन ही थॉमस मेकॉले याची भूमी. हा मेकॉले तोच ज्याने भारतात इंग्रजी, तसेच आधुनिक शिक्षणाचा पाया रचून उच्चतम अशा भारतीय शिक्षणपद्धतीचा सत्यानाश केला. याच आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे ‘शहाणे’ झालेले भारतातील मेकॉलेपुत्र भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची मागणी करत आहेत. अशी मागणी करणार्‍यांना ब्रिटनमधील शाळांमध्ये वाढलेले ‘रेप कल्चर’ ही चपराक आहे.

हे कसले लैंगिक शिक्षण ?

भारतात मुलांना लैंगिक शिक्षण देण्याविषयी पुरो(अधो)गाम्यांकडून वारंवार मागणी केली जाते. वर्ष २०१२ मध्ये निर्भया प्रकरणात पीडितेवर पाशवी अत्याचार केल्यानंतर ही मागणी जोर पकडू लागली. त्यानंतर काही वर्षांनी निर्भया प्रकरणातील वासनांध गुन्हेगारांच्या मुलाखती असलेला लघूपट प्रसारित झाला. त्यात एका गुन्हेगाराने ‘मी बलात्कार करत असतांना निर्भयाने विरोध केला नसता, तर तिचे प्राण वाचले असते’, असे विधान केले होते. ‘हे विधान भारतातील पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे त्यांच्या मनात महिलांविषयी असलेली हीन भावना दर्शवते’, असे सांगत ‘भारतात लैंगिक शिक्षणाला पर्याय नाही’, अशी आवई उठवली गेली. आता असे धरून चालूया की, भारतात पुरुषसत्ताक संस्कृतीमुळे स्त्रियांवर अत्याचार होतात, मग ब्रिटनचे काय ? ब्रिटनमध्ये शाळांमधून लैंगिक शिक्षण दिले जाते. एवढेच कशाला, आता तेथील लैंगिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सुधारणा करून समलैंगिकतेविषयीही शिक्षण देण्यात येणार आहे. लैंगिक शिक्षणावर तेथे फारच जोर आहे ! तेथील काही शाळांच्या परिसरात ‘सेक्स क्लिनिक’ आहेत. तेथे मुलांना ‘कंडोम’ किंवा गर्भनिरोधक गोळ्या मिळतात. त्याही पुढे जाऊन मुलींना ‘गर्भ राहिला आहे कि नाही, हे पडताळण्यासाठी गर्भचाचणीही केली जाते ! तेथील लैंगिक शिक्षणाच्या अंतर्गत  मुलांनी शरीरसंबंध ठेवण्यास कुणाची ना नाही; मात्र ते ठेवतांना गर्भधारणा होऊ नये किंवा गुप्तरोग होऊ नयेत, यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे शिकवले जाते. या पाश्‍चात्त्य देशांमध्ये मुलांना लैंगिक शिक्षण दिल्यामुळे तेथील बलात्कार किंवा लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांचा टक्का घसरला आहे, असे झाले आहे का ? याचे उत्तर नाही’, असेच आहे. बलात्कारांच्या प्रकरणात अमेरिका आघाडीवर आहे. ब्रिटनमध्ये एकट्या इंग्लंडमध्ये वर्ष २०१६-१७ मध्ये मुलांवरील लैंगिक अत्याचारांची ४३ सहस्र ५२२ प्रकरणे नोंदवण्यात आली. वेल्स, स्कॉटलँड आणि आयर्लंड येथे घडलेल्या घटना वेगळ्याच. ज्या देशांमध्ये शाळांमधून लैंगिक शिक्षण देण्यात येते, तेथील स्त्रिया आणि मुली सुरक्षित आहेत, असे नाही. त्यामुळे अशा लैंगिक शिक्षणाचा अट्टहास भारतात कशाला ?

फसलेला प्रयोग !

थोडक्यात लैंगिक शिक्षणाचा प्रयोग जागतिक स्तरावर फसला आहे. आता तर अमेरिका आणि युरोपीय खंडातील काही देशांतील पालक अशा शिक्षणाला विरोध करू लागले आहेत. आता नैतिकतेला धरून लैंगिक शिक्षण देण्याचा नवा प्रयोग पुढे येत आहे. अनेक देशांमध्ये मुलांना विवाहानंतर शरीर संबंध प्रस्थापित करणे कसे लाभदायक आहे, हे शिकवण्यात येते. ‘ज्या मुलांना घरांमधून धार्मिक शिक्षण, नैतिक शिक्षण दिले जाते, ती मुले लहान वयात शरीरसंबंध प्रस्थापित करत नाहीत’, असेही काहींचे म्हणणे आहे.  भारतात मुलांना लैंगिक शिक्षण देण्याचा अट्टहास करणार्‍यांसाठी हे झणझणीत अंजन आहे.

ब्रिटनमधील ‘रेप कल्चर’वर चर्चा झोडल्या जात आहेत; मात्र ते रोखायचे कसे, याविषयी समाजधुरिणांमध्ये संभ्रम आहे किंवा जे उपाय सुचवले आहेत, ते वरवरचे आहेत. मुलांना काय शिकवायचे आणि काय शिकवू नये, याचेही भान पाश्‍चात्त्यांना राहिलेले नाही.  ही अतीशहाणी मंडळी भारतियांना मुलांना दर्जात्मक शिक्षणावरून फुकाचे सल्ले देतात, हे संतापजनक होय. मेकॉलेने समृद्ध अशी हिंदु संस्कृती आणि वारसा नष्ट करण्यासाठी भारताला कारकुनी शिक्षणपद्धत अवलंबण्यास भाग पाडले. आज त्याच मेकॉलेच्या भूमीत शिक्षणक्षेत्राचे घोर अधःपतन होतांना आपल्याला दिसत आहे. हा कालमहिमा आहे. हे लक्षात घेऊन उच्चतम हिंदु शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्याची हीच योग्य वेळ आहे !