माळशिरस (सोलापूर) येथे बसस्थानका समोरील ९ दुकानांना आग !

माळशिरस (जिल्हा सोलापूर) – शहरातील बसस्थानकासमोरील ९ दुकानांना २८ मार्चच्या पहाटे आग लागली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्‍वनाथ वडजे यांना पंचनामा करून हानीग्रस्तांना अधिकाधिक साहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर साखर कारखाना आणि यशवंतनगर येथील शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना या दोन साखर कारखान्यांच्या अग्नीशामक बंबांनी ही आग सकाळी आटोक्यात आणली. माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असणारे शहर असल्याने येथे अग्नीशामक बंब असणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘प्रशासनाने अग्नीशामक बंब त्वरित घ्यावा’, अशी मागणी नागरिक करत आहेत. (अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)