अमेरिकेचे आकर्षण !

चित्रपट, मालिका यांतील विविध प्रसंगांतील संवादांतून उठसूठ अमेरिका या देशाचाच घोषा लावलेला असतो. उच्च शिक्षण घेतल्यावर अमेरिकेत नोकरी मिळाली, तर चांगले होईल, अशी आस बाळगून असणारे भारतीयही आहेत. डॉलरमध्ये पैसे कमावता यावे, उंची रहाणीमानाची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करता यावीत, नातेवाईक-मित्र परिवारात ‘अमेरिकेला असतो’, असे सांगता यावे, तसेच हाती पैसे आल्यावर हवी तशी मौजमजा करता यावी आदी कारणांसाठी अमेरिका हवी असते. ‘कोणता देश पहायला आवडेल ?’, असे विचारले, तर ‘एकदा तरी अमेरिकेला जायचे ?’, अशी उत्तरे अनेकांकडून ऐकायला मिळतील.

अमेरिकेत चाकरी करणारे श्रेष्ठ आणि येथे नोकरी-व्यवसाय करणारे तुलनेत कनिष्ठ असा कुठेतरी सूर वारंवार अमेरिकेचे गोडवे गाण्यात असतो. तिथे नोकरी करणे, हा काही नोकरदार वर्गाच्या आस्थापनाच्या कामाचा भाग आहे; पण मला अमेरिकेतच नोकरी मिळाली, तर माझ्या कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या भले होईल, असा विचार असणार्‍या नोकरदार वर्गाची संख्या अधिक आहे. अल्पावधीत बक्कळ पैसे कमावणे आणि विलासी जीवन जगणे यांसाठीच शिक्षण घेऊन जीवन जगणार्‍यांच्या एकलकोंड्या जीवनाला काय अर्थ आहे ? हाती आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा खुळखुळू लागला की, दैनंदिन गरजा पुष्कळ वाढतात. सुखासीन जीवनात रमण्यासह वागण्या-बोलण्यातही केव्हा पालट होतो, हे कळत नाही.

उच्चशिक्षित असूनही भारतात राहून काम करणारे अभियंते, वैज्ञानिक नक्कीच श्रेष्ठ वाटतात, उदा. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ‘आमच्या ज्ञानाचे महत्त्व येथे लक्षात घेतले जात नाही’, असे सांगितले जाते. एक अभियंता म्हणून विचारावेसे वाटते की, जिथे सर्व पूर्वसिद्धता झालेली आहे, तिथे जाण्याची आस बाळगणे योग्य कि जिथे सिद्धता करायची आहे, त्याला संधी समजून आरंभ करणे योग्य ? नवनिर्माण करणे, हे अभियंत्यांचे कार्य असते. त्यामुळे अमेरिकेपेक्षा भारतातच कित्येक संधी आहेत. अमेरिकेचा अभिमान बाळगण्यापेक्षा भारताचा स्वाभिमान असणारे नक्कीच सर्वार्थाने उजवे आहेत.

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई